मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर्थिक अडचणीत सापडलेल्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने नगरचे उद्योजक संदीप थोरात यांनी दरमहा एक लाख रुपयांच्या नोकरीची ऑफर दिली होती. ही ऑफर विनोद कांबळी यांनी नुकतीच स्वीकारली आहे. विशेष म्हणजे याबाबत सह्याद्री मल्टिस्टेटचे चेअरमन संदीप थोरात यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. सह्याद्री मल्टिस्टेट फायनान्स कंपनीच्या मानद संचालकपदाची धूरा कांबळींवर सोपविण्यात आली आहे. मुंबईच्या मातीतून आतापर्यंत देशाला अनेक प्रतिभावंत क्रिकेटपटू मिळाले आहेत. अशा क्रिकेटपटूंमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या जोडीचा समावेश होतो. मात्र, सचिनला ज्याप्रमाणात यश आणि प्रसिद्धी मिळाली तशी प्रसिद्धी विनोदला मिळाली नाही.
कधीकाळी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करून सोडणारा विनोद कांबळी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) मिळणारे ३० हजार रुपये निवृत्ती वेतन हा कांबळीच्या उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत आहे. “मी एक निवृत्त क्रिकेटपटू आहे. मी सध्या पूर्णपणे बीसीसीआयच्या निवृत्तीवेतनावर अवलंबून आहे. त्यासाठी मी खरोखर मंडळाचा आभारी आणि कृतज्ञ आहे. निवृत्तीवेतनामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य होत आहे,” असे कांबळीने एका मुलाखतीत सांगितले होते.
इतकेच नव्हे तर मला कामाची गरज आहे. मी तरुणांसोबत काम करायला तयार आहे. मुंबईने अमोल मुझुमदार यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम ठेवले आहे. पण, गरज भासली तर मला संधी द्यावी. मला मुंबईच्या संघासोबत काम मिळावे, अशी माझी इच्छा आहे. माझ्या मागे माझे कुटुंब आहे, त्यामुळे काम करणे गरजेचे आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने मला काहीतरी काम द्यावे, असे विनोद कांबळी म्हणाला होता.
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी आपल्या हालाखीच्या आर्थिक परिस्थितीबाबत केलेलं वक्तव्य नगरचे उद्योजक संदीप थोरात यांना समजले होते. देशासाठी खेळलेल्या खेळाडूवर अशी परिस्थिती ओढवल्याने आपण त्यांना ही ऑफर दिल्याचे संदीप थोरात यांनी सांगितले होते.सोबतच क्रिकेट हा मॅनेजमेंटचा खेळ आहे आणि एखाद्या फायनान्स कंपनीत ही मॅनेजमेंट खूप महत्वाचे असते. त्यामुळे कांबळी यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा आमच्या कंपनीला फायदाच होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांनी गुरुवारी मुंबईत जाऊन कांबळी यांची भेट घेतली आणि आपली ऑफर त्यांना सांगितली.
विशेष म्हणजे विनोद कांबळी यांनीही ही ऑफर स्वीकारत संदीप थोरात यांचे आभार मानले.दरम्यान थोरात यांनी तात्काळ कांबळी यांना एक लाख रुपयांचा चेक प्रदान केला. एकेकाळी क्रिकेटचे मैदान गाजवणारे विनोद कांबळी आता सह्याद्री मल्टिस्टेट फायनान्स कंपनीच्या मानद संचालक पदी दिसणार आहेत.त्यांच्यासाठी ही नवीन कारकीर्द असणार आहे.मुंबई येथील शाखेची जबाबदारी ते यापुढे सांभाळतील अशी माहिती थोरात यांनी दिली आहे.
विनोद कांबळीनं आपल्या कारकिर्दीत भारतासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या 1 हजार 84 धावा आणि कसोटीत 2477 धावा आहेत. लहानपणी तो सचिनसोबत क्रिकेट खेळायचा. त्यानं आपल्या कारकिर्दीची सुरुवातही दमदार पद्धतीनं केली. पण नंतर तो आपला फॉर्म कायम राखू शकला नाही आणि संघाबाहेर बाहेर पडावं लागलं. त्यानंतर तो अनेक वेळा कामाचे शोधात होता त्याला आर्थिक अडचणीत असल्यामुळे पैशांची गरज होती अखेर त्याला आता चांगली ऑफर आली आहे आणि ती त्याने स्वीकारले आहे.
Former Cricketer Vinod Kambli Got Job
Salary Sahyadri Multistate Sandip Thorat