नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमेरिकेत एका एकरात तब्बल ३० क्विंटल सोयाबीन होतं आणि आपल्या देशात ४ क्विंटलच्या वर नाही. असे का, जर तिकडे होते तर इकडे का होत नाही. मग आपल्याकडच्या कृषी विद्यापीठांचा काय फायदा? असा प्रश्न केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री गडकरी यांनी उपस्थित केला आहे. त्यानिमित्ताने आपल्याकडील कृषी विद्यापीठांची आणि त्यांच्या कार्याची चर्चा सुरू झाली आहे.
गडकरी म्हणाले की, आपल्या भारत देशात पाण्याची कमी नाही, तर पाण्याचा नियोजनाचा अभाव आहे. नदीजोड प्रकल्पातून एका खोऱ्यातील पाणी दुसऱ्या खोऱ्यात नेले तर क्रांती होईल. तसेच्या पाण्याचा खरा प्रश्न काही राज्यातील आहे. पण योग्य नियोजन केल्यास मराठवाडा आणि विदर्भाला मोठा फायदा सिंचन क्षेत्रात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
गडकरी म्हणाले की, कृषी क्षेत्रात पाहिजे त्या प्रमाणात संशोधन झाले नाही, देशात मोठ्या प्रमाणात धान्य हे सरकारच्या गोडावूनमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे गहू, ज्वारी, तांदूळ या पारंपरिक पिकाऐवजी पीक पद्धती बदलली गेली तर शेतकर्याचे आर्थिक विकास होण्यास मदत होईल. आगामी काळात पाणी हाच कळीचा मुद्दा आहे. देशात ५० टक्के सिंचन झाले तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यामुळे सिंचनावर सर्वाधिक फोकस विदर्भ आणि मराठवाड्याने करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
राज्यात ४ विद्यापीठे
महाराष्ट्रामध्ये एकूण चार कृषी विद्यापीठ आहेत. त्यात राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांचा समावेश आहे. या सर्व विद्यापीठांना संलग्न असलेली महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद ही संस्थाही कार्यरत आहे. तर राज्यात एकूण २० कृषी विज्ञान केंद्रे आहेत.
यापूर्वीही प्रश्नचिन्ह
राज्यातील कृषी विद्यापीठांचा कारभार, अभ्यास आणि संशोधन यावर बरीच चर्चा झाली आहे. मात्र, विद्यापीठांच्या संशोधन आणि शेतकरी उपयोगी कामकाजात फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे ही बाब वारंवार समोर येते. त्याची चर्चा होते आणि पुढे मात्र काही होताना दिसत नाही.
Foreign Agriculture University And Indian University Research Crop Production