इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मध्य प्रदेशच्या इंदूर शहरामध्ये स्वर्णबाग कॉलनीतील एका दोन मजली घराला भीषण आग लागली. या दुर्घटनेत सात जणांचा जिवंत होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. घटनेच्या वेळी सर्व जण घरात गाढ झोपेत होते. मृतांमधील बहुतांश रहिवाशांचा मृत्यू जळून आणि श्वास गुदमरल्यामुळे झाला. या दुर्घटनेत आठ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
इंदूरमधील विजयनगर परिसरात ही कॉलनी आहे. माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी पोहचले. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. दुर्घटनेत होरपळून मृत्यू झालेले बहुतांश रहिवासी भाडेकरू होते. इंदूरचे पोलिस आयुक्त हरिनारायणचारी मिश्रा यांनी सात जणांचा मृत्यू झाल्याला दुजोरा दिला आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ही आग आधी शॉर्ट सर्किटमुळे लागून नंतर पार्किंगमध्ये उभ्या वाहनांवर फैलावली. नंतर हळूहळू पूर्ण घरात पसरली. आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर कोणालाच बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
https://twitter.com/PMOIndia/status/1522829688045191168?s=20&t=DmNmoFUDSiUUoJvZHw_HDw
दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली. आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश देत यामध्ये दोषी आढळलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन चौहान यांनी दिले. जिल्हाधिकारी मनीष सिंह यांनी एमवाय रुग्णालयात जाऊन जखमींच्या तब्येतीची विचारपूस केली. या घटनेची चौकशी केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत दिली जाईल, तसेच जखमींना आरबीसीच्या कलमांतर्गत आर्थिक मदत दिली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. स्वर्णबाग कॉलनीतील अनधिकृत बांधकामाची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
https://twitter.com/ChouhanShivraj/status/1522789410512994305?s=20&t=DmNmoFUDSiUUoJvZHw_HDw