मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोन्याच्या दरांना आलेल्या झळाळीमागे वेगवेगळी कारणे आहेत. रशिया-युक्रेन युद्धापासून ते अमेरिकेतील वाढत्या व्याजदरांमुळे वाहू लागलेले मंदीचे वारे व परिणामी बँकांमध्ये निर्माण झालेले संकट, युरोपमधील वाढते व्याजदर आणि जगभरातील अर्थव्यवस्थेत आलेली मंदी ह्यांपर्यंत अनेक कारणे यामागे असल्याचे एंजल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. यावर्षी आपण सोन्याच्या किमतींनी भारतीय बाजारपेठेत नवनवीन उच्चांक गाठलेले पाहिले आणि लवकरच हा दर प्रति १० ग्रॅम ६४,००० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.
यावर्षी सोन्याच्या दरांनी आंतरराष्ट्रीय बाजारांत तसेच एमसीएक्समध्ये अनुक्रमे सुमारे १२.५ टक्के आणि १२ टक्के परतावा दिला आहे. सोन्याचा दर घसरला असताना ते जमा करून आणि सोन्यात दीर्घकाळ पैसा गुंतवून ठेवण्याचा सल्ला श्री प्रथमेश माल्या यांनी दिला.
सोन्याच्या किमती २०२३ मध्ये खूपच वेगाने वाढल्या असल्यामुळे, या तेजीच्या बाजारपेठेत गुंतवणूकदार किती काळ सोने जमा करतात हे बघण्याजोगे आहे. भारतात सोन्याच्या किमतीने आत्तापर्यंतचा उच्चांक गाठून, प्रति १० ग्रॅम्स ६१,५०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मागणीला कदाचित फटका बसू शकतो, तर सोन्यात गुंतवणूक करणारेही खरेदीचे बेत पुढे ढकलतील आणि किंमत कमी झाल्यावर खरेदी करण्याचा निर्णय घेतील. सोन्याच्या किमतीने भारतीय ग्राहकांसाठी आपली दरमर्यादा बरीच ताणली आहे आणि भारतीय ग्राहकांनी प्रति १० ग्रॅम, ५६,०००-५८,००० या किमतीला सोने खरेदी केले तर तो उत्तम व्यवहार ठरेल.
वाढलेला भूराजकीय धोका, बाजारातील आर्थिक मंदी, व्याजदरांनी गाठलेला कळस आणि अमेरिकी डॉलरमधील संभाव्य कमकुवतपणा, बँक संकटामुळे इक्विटी मूल्यांकनात निर्माण झालेले धोके आणि सर्वांत शेवटचे पण महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय बँकेद्वारे सोने खरेदी केली जाणे हे सर्व घटक २०२३ मध्ये सोन्याची कामगिरी कशी असेल हे निश्चित करणार आहेत. लवकरच सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६४,००० रुपयांवर जाण्याचा अंदाज श्री माल्या यांनी व्यक्त केला आहे.
अमेरिकेतील बँकिंग संकट सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांच्या पथ्यावर:
चलनवाढीचा ताण कमी करण्यासाठी यूएस फेडरलने संपूर्ण २०२२ मध्ये आक्रमकरित्या कडक धोरण राबवले आहे आणि व्याजदरात वाढ करण्याचा सपाटा २०२३ मध्येही कायम राखला आहे. फेडरल रिझर्व्हने एक वर्षाहून किंचित अधिक कालावधीत आपल्या १०व्या व्याजदरवाढीला मंजुरी दिली (त्यांच्या २-३ मे २०२३ रोजी झालेल्या बैठकीत) आणि सध्याचे हात आखडता घेण्याचे सत्र समाप्तीकडे जात आहे असा अनिश्चित संकेत दिला.
फेडरल निधी दर ५-५.२५ टक्के एवढ्या लक्ष्यश्रेणीत घेऊन जाण्याचा विस्तृतरित्या अपेक्षित निर्णय सार्वमताने घेण्यात आला होता. केंद्रीय बँकेने मार्चमध्ये जारी केलेल्या टिपणातील एक वाक्य बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनातून वगळण्यात आले होते. फेडरलला २ टक्के चलनवाढीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘अतिरिक्त धोरण निश्चिती योग्य ठरू शकेल असे समितीला अपेक्षित आहे’, हे ते वाक्य होते.
फेड हे दर चढ्या स्तरांवर किती काळ राखू शकेल हे अज्ञात असले, तरी जागतिक गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीमधील, विशेषत: सोन्यामधील, रस २०२३ मध्ये लक्षणीयरित्या वाढला आहे. याशिवाय अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रात निर्माण झालेल्या संकटाने (सिलिकॉन व्हॅली बँक, सिग्नेचर बँक व क्रेडिट स्युईसचे कोसळणे आणि बँकिंग क्षेत्रातील महाकाय जेपी मॉर्गनद्वारे अलीकडेच पहिली रिपब्लिक बँक ताब्यात घेतली जाणे), गेल्या काही आठवड्यांत, गुंतवणूकदारांमधील सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्यातील रस वाढवला आहे. सोने ह्या मालमत्ता वर्गाकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून बघितले जाते. बाजारात पैशाचा ओघ कमी होतो, आर्थिक प्रणालीतील गोष्टी थोड्या कठीण होतात, तेव्हा सोन्याचा आधार घेतला जातो.
Finance Gold Rates Investment Expert Opinion