लखनऊ (उत्तर प्रदेश) – चोरी करणे हा गुन्हा असला तरी चोरांना मात्र चोरी करण्यास काही वाटत नाही, शक्यतो कोणतेही चोर हे पैसे, दागिने किंवा मौल्यवान वस्तूंची चोरी करतात. परंतु काही भुरटे चोर अगदी एखाद्या वेगळ्याच किंवा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीची ही चोरी करतात. उत्तर प्रदेशात असाच चोरीचा विचित्र प्रकार घडला.
राज्याची राजधानी लखनऊमध्ये मिराज या लढाऊ विमानाचे चाकच चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. लढाऊ विमानाचे चाक चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. मिराज विमानाचे चाक चोरणारे हे स्कॉर्पिओ गाडीतून आल्याचे सांगण्यात येत आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या ट्रकमध्ये असलेले मिराजचे चाक कोणी चोरले, याचा तपास सुरू आहे. चाक चोरीला गेल्याची माहिती ट्रक चालकाला समजताच त्याने सर्वप्रथम पोलिसांना याबाबत माहिती दिली. आता लढाऊ विमानाचे चाक चोरलेल्या भामट्यांचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, ट्रक चालक हेम सिंग रावत यांच्या म्हणण्यानुसार, तो लखनौहून अजमेरला लढाऊ विमानाचे चाक घेऊन जात होता. दरम्यान दुपारी शाहिद पथ येथे ट्राफीक जाम झाला होता. यादरम्यान स्कॉर्पिओमध्ये स्वार असलेले काही जण आले होते. त्याचवेळी वाहतूक कोंडीमुळे ट्रक संथ गतीने पुढे जात होता. त्याचवेळी ट्रकचा मागील पट्टा कापून चाक चोरीला गेले. ही बाब त्यांना समजताच त्यांनी फोन करून चोरीची माहिती दिली. पोलिसांनी पुढे सांगितले की, मिराज या लढाऊ विमानाचे चाक चोरीला गेल्याची घटना २७ नोव्हेंबरची आहे. त्याचा एफआयआर १ डिसेंबर रोजी नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस हे रस्त्याच्या आजूबाजूला लावलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत. चोरांना पकडण्यासाठी संशयितांची चौकशीही केली जात आहे.