नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी मोठा आरोप केला आहे. जॅक डोर्सी म्हणाले की, भारतात कृषी कायद्यांविरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान सरकारने अनेक गंभीर ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. भारत सरकारने आपल्यावर दबाव आणला होता आणि भारतात ट्विटर बंद करण्याची धमकी दिली होती, असा दावाही डोर्सी यांनी केला आहे.
हा आहे मोठा आरोप
‘ब्रेकिंग पॉइंट्स’ या यूट्यूब चॅनलने ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. यातील एक प्रश्न असा होता की, त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न कधी सरकारकडून झाला होता का? प्रत्युत्तरात डॉर्सी यांनी असे अनेकवेळा घडल्याचे सांगितले आणि डॉर्सीने भारताचे उदाहरण दिले. डोर्सी म्हणाले की, ‘सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापे टाकल्याची चर्चा होती. तसेच नियम न पाळल्याबद्दल कार्यालय बंद करण्याची धमकी दिली. भारतासारख्या लोकशाही देशात हे सर्व घडल्याचे डोर्सी म्हणाले. त्याचप्रमाणे डोर्सी यांनी तुर्कस्तानचेही उदाहरण देत सांगितले की, त्यांच्या देशातही ट्विटर बंद करण्याची सरकारकडून धमकी देण्यात आली होती. डोर्सी म्हणाले की त्यांच्या कंपनीने तुर्कीमध्ये सरकारविरुद्ध अनेक खटले लढले आणि जिंकले.
नोव्हेंबर २०२० मध्ये, भारत सरकारने देशात तीन कृषी कायदे लागू केले. मात्र, कायदा लागू होताच त्यांचा विरोधही सुरू झाला आणि वर्षभरापासून देशभर आंदोलने, धरणे झाली. अखेर एका वर्षानंतर म्हणजेच नोव्हेंबर २०२१ मध्ये केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. आंदोलनादरम्यान सरकारला सोशल मीडियावर मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले.
Farmer Protest Twitter CEO Jack Dorsey