इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी मनोरंजन विश्वात काही जुने जाणते कलाकार आहेत, ज्यांच्या कामामुळे त्यांनी स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं आहे. आजही त्यांचे नाव घेतले की, त्यांच्या भूमिका समोर येतात. यातीलच एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक. मूळ डॉक्टरी पेशातले असले तरी गिरीश ओक यांनी अभिनयाचा मार्ग स्वीकारला.
१९८४ पासून त्यांनी थिएटर ते चित्रपट सगळीकडे आपल्या अभिनयाची छाप पाडली. अगदी साठीच्या वयातही ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेतील गिरीश ओक यांच्या शेफ अभिजीत राजेंच्या भुमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. त्यांच्या या भूमिकेला चाहत्यांचंही प्रचंड प्रेम मिळालं. सध्या ते फारसे कोणत्या मालिका अथवा चित्रपटात दिसत नाहीत. त्यांची एक पोस्ट व्हायरल होते आहे. ‘मीच माझा प्रतिस्पर्धी’ असं लिहित त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेते गिरीश ओक पोस्टमध्ये असं म्हणतायत,
‘मीच माझा प्रतिस्पर्धी
असं इतर कोणाच्या बाबतीत झालंय की नाही मला माहीत नाही पण माझ्या बाबतीत तरी पहिल्यांदा झालं. सध्या माझी दोन नाटकं सुरू आहेत. ” ३८ कृष्ण व्हिला” आणि “काळी राणी”. ‘झी नाट्य गौरव’ला या दोन्ही नाटकांसाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून मला नामांकन मिळालं. खरं तर दोन विरुध्द टोकाच्या भूमिका माझ्या माध्यमातून एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या. काल या दोन्ही भूमिकांना सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. मला कळतच नाहिये मी माझ्या कुठल्या भूमिकेचं अभिनंदन करू ते. आता तुम्हीही विचाराल तुम्हाला कोणत्या भूमिकेसाठी हवं होतं ? पण असं नाही नं सांगता येत एकीचं नाव घेतलं तर दुसरी माझ्यावर नाराज होणार आणि मलाच दोन्ही भूमिकांचे अजून खूप प्रयोग करायचे आहेत.”३८” चे १२५ होत आले आहेत आणि “राणी” चे ५० फक्त.’ अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=744932387005277&id=100044655663901
अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या वयातही त्यांचा कामाप्रती असलेला उत्साह सगळ्यांनाच अवाक करणारा आहे. त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे.
Famous Actor Girish Oak Social Media Post Viral