अयोध्या (उत्तर प्रदेश) – देशभरातील लोकप्रतिनिधींच्या भ्रष्टाचार आणि गैरकारभार यांच्या गोष्टी आपण नेहमीच ऐकतो. याचप्रमाणे उत्तर प्रदेशात असेच एक सुमारे 29 वर्षापूर्वीचे प्रकरण आता उघडकीस आले आहे. या प्रकरणात साकेत महाविद्यालयात मार्कशीट आणि पेपर कोड आदी कागदपत्रांमध्ये फसवणूक केल्याने अयोध्येच्या गोसाईगंज मतदारसंघातील भाजपचे आमदार इंद्र प्रताप तिवारी उर्फ खब्बू तिवारी यांच्यासह तिघांना विशेष कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
आमदार इंद्र प्रताप तिवारी, विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि सपा नेते फुलचंद यादव आणि चाणक्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष , कृपा निधान तिवारी यांच्यावर गुन्ह्याचा आरोप सिद्ध झाल्यावर खासदार, आमदार यांच्या सह अन्य लोकप्रतिनिधीसाठीच्या विशेष न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. या तीन आरोपींना प्रत्येकी पाच वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच सर्वांना 19 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. निकालानंतर तिन्ही आरोपींना कडक सुरक्षा व्यवस्थेदरम्यान न्यायालयीन कोठडीत तुरुंगात पाठवण्याचे आदेश देण्यात आले.
एका फिर्यादीनुसार, दि.14 फेब्रुवारी 1992 रोजी बनावट मार्कशीटच्या आधारे साकेत पदव्युत्तर महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याचे प्रकरण उघडकीस अखेर उघडकीस आले आहे. यापैकी, फुलचंद यादव हा 1986 मध्ये B.Sc प्रथम वर्षाची परीक्षा नापास होऊनही B.Sc द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यास पात्र नव्हता. परंतु परीक्षेच्या निकालाच्या पत्रकात फेरफार करून फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्याने विद्यापीठाची मार्कशीट प्राप्त केली. त्याचप्रमाणे, अशाच प्रकारे इंद्र प्रताप तिवारी याने 1990 मध्ये B.Sc द्वितीय वर्षाच्या परीक्षेत नापास असूनही B.Sc. तृतीय वर्षात प्रवेश मिळवला. तसेच प्रथम वर्ष 1989 मध्ये कृपानिधान तिवारी, LLB पहिल्या वर्षी नापास असूनही, फसवणूक करून LLB द्वितीय वर्षात प्रवेश मिळवला. या तिघांनी गैरव्यवहार आणि फसवणुकीच्या आधारे महाविद्यालयात प्रवेश मिळाला.
कालांतराने बाब साकेत महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य यदुवंश राम त्रिपाठी यांच्या निदर्शनास आली, तेव्हा त्यांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना भेटून या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार संबंधित न्यायालयात तिघांविरुद्ध आरोपपत्र सादर केले. त्यानंतर फिर्यादी आणि साक्षीदारांच्या वक्तव्याच्या आधारावर न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश पूजा सिंह यांनी या प्रकरणात तिघांना दोषी ठरवले. यानंतर, तिघांनाही पाच वर्षे कारावास आणि 19 हजार दंड अशी शिक्षा सुनावली. या तीन आरोपींना शिक्षा झाल्याची घटना ऐकून त्यांच्या समर्थकांची न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती.