हिस्सार (हरियाणा) – अनुसूचित जातीबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला अटक केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री युविका चौधरीला हरियाणा पोलिसांनी अटक केली. कारण युविकावर एका व्हिडिओमध्ये अनुसूचित जातींविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.
हांसी ( जि. हिस्सार, हरियाणा) पोलीस ठाण्याने सुमारे तीन तास त्याची चौकशी केली. या अभिनेत्रीवर एससी व एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्यानंतर तिला पंजाब – हरियाणा उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. युविका मुंबईहून हांसीला पोहोचली होती. तिचे वकील अशोक बिश्नोई यांनी सांगितले, माझी क्लायंट उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तपासात सामील झाली आहे आणि ती सध्या अंतरिम जामिनावर आहे. आता या प्रकरणाची उच्च न्यायालयात 24 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
या वर्षी मे महिन्यात युविकाने तिचा पती आणि अभिनेता प्रिन्स नरुलासोबत एक व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये ती जातीयवादी शेरेबाजी करते आहे, मात्र हे प्रकरण वाढले तेव्हा युविकाने माफीही मागितली होती आणि म्हटले होते की तिला त्या शब्दाचा अर्थ माहित नाही. तरीही त्यानंतर दलित हक्क कार्यकर्ते रजत कलसन यांनी हंसी येथील अभिनेत्रीवर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
यापुर्वी अशा प्रकारे माजी क्रिकेटपटू युवराज सिंगलाही हरियाणा पोलिसांनी अनुसूचित जातीबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल अटक केली होती. काही काळानंतर त्यांची अंतरिम जामिनावर सुटका झाली. युवराज सिंग ओपनर रोहित शर्मासोबत इंस्टाग्राम लाइव्ह चॅटवर बोलत होता. या दरम्यान, दोघेही युजवेंद्र चहलबद्दल बोलत होते, जेव्हा युवराजने कथित जातियवादी शब्द वापरला होता. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला, त्यात युवराज जातीयवादी भाष्य करताना दिसत आहे. या प्रकरणी हिसार, हांसी येथे दलित हक्क कार्यकर्ते आणि वकील रजत कलसन यांनी युवराजविरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती.