इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगातील सर्वात लोकप्रिय अॅप फेसबुक अर्थात मेटा बाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अनेक कर्मचारी फेसबुकला रामराम करीत असल्याचे सांगितले जात आहे. त्याला कारणीभूत फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याच्या काही वाईट सवयी असल्याचा दावा केला जात आहे.
मार्क इलियट झुकरबर्गचा जन्म १४ मे १९८४ रोजी झाला असून एक अमेरिकन संगणक प्रोग्रामर आणि इंटरनेट उद्यमी आहे. ते फेसबुकचे सहसंस्थापक आहेत आणि सध्या ते त्याचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संपत्ती सुमारे ९४.२ अब्ज अमेरिकी डॉलर एवढी असून जगातील पाचपैकी एक सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणना केली जाते. परंतु जगभरात फेसबुक अत्यंत प्रसिद्धीच्या झोतात असताना आता त्या संदर्भात काही आरोप देखील करण्यात येत आहेत.
केवळ याला महत्त्व
४ फेब्रुवारी २००४ रोजी झुकरबर्गने आपल्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या वसतीगृहात खोलीतून फेसबुक लॉंच केले. आता फेसबुकचे सीईओ म्हणून झुकेरबर्गला एक डॉलरचा पगार प्राप्त होतो. प्रक्षोभक विधाने, अफवा, हिंसाचाराला प्रोत्साहन आणि लोकशाहीसाठी धोकादायक माहिती आदी रोखण्याकडे ‘फेसबुक’कडून होणाऱ्या दुर्लक्षाचा गौप्यस्फोट करणाऱ्या ‘व्हिसल ब्लोअर’ फ्रान्सेस हॉगेन जगभरात प्रकाशझोतात आल्या आहेत. माध्यमांना पुरविलेली माहिती, त्यावरून दाखल झालेल्या तक्रारी आणि अमेरिकी सिनेटच्या समितीपुढे दिलेल्या साक्षीने अतिबलाढ्य फेसबुकचे काही कारनामे समोर आले आहेत. ‘लाइक, शेअर आणि कमेंट’ यावर चालणाऱ्या व्यवसायात केवळ नफ्याला महत्त्व दिले जात असून, सामाजिक बांधिलकीकडे दुर्लक्ष होत आहे, असा त्यांच्या आरोपांचा आशय आहे. फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांनी आरोप फेटाळले असले, तरी हा विषय आता चर्चेला आला आहे.
मेटा डबघाईला
हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे फेलो बिल जॉर्ज यांनी ‘मेटा’चे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. जॉर्ज यांच्या दाव्यानुसार कामाच्या ठिकाणी तुम्हाला बॉसच्या पाच वाईट सवयी आढळतील आणि झुकरबर्ग त्यापैकी एक बॉस आहे. ते म्हणाले की झुकरबर्गकडे नेतृत्व क्षमता कमी आहे आणि तो वारंवार आपल्या निर्णयांनी मेटा (META ) ला डबघाईला आणण्याचे काम करत आहे. झुकरबर्गमुळे कर्मचारी कंपनी सोडत आहेत. जॉर्जच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत झुकरबर्ग ‘मेटा’चा सीईओ राहील तोपर्यंत कंपनी अपयशी ठरत राहील.
मार्क भरकटला
हार्वर्ड फेल आणि मेडिकल टेक्नोलॉजी कंपनी Medtronic चे माजी सीईओ जॉर्ज यांच्या दाव्यानुसार META यापुढील काळातही अपयशीच ठरत राहील. “मला वाटतं जोपर्यंत मार्क झुकरबर्ग मेटामध्ये सीईओ आहे तोपर्यंत फेसबुक चांगलं काम करू शकणार नाही. लोकांचा कंपनीबद्दल भ्रमनिरास होण्यामागे झुकरबर्ग हेच एक कारण आहे. तो खरोखरच भरकटला आहे, असे बिल जॉर्ज यांनी त्यांच्या एका पुस्तकात म्हटले आहे.
त्यातून धडा
कोणत्याही कामापेक्षा स्टाईलवर जास्त भर देणारे कर्मचारी मार्क झुकरबर्ग कामावर ठेवतात, असा आरोप जॉर्ज यांनी केला आहे. तसेच तो चुकांची जबाबदारी घेऊन तो त्याच्यातून शिकण्याचा प्रयत्न करत नाही. उदाहरण देताना, जॉर्ज यांनी एक गोष्ट निदर्शनास आणून दिली. जेव्हा ‘मेटा’ने बाजार मूल्य फेब्रुवारीमध्ये २३२ अब्ज डॉलरपेक्षा जास्त गमावले, तेव्हा झुकरबर्गने या अपयशाचे खापर अॅपलच्या गोपनीयतेवर आणि टिकटॉक सारख्या प्लॅटफॉर्मवर फोडले.
ग्राहकांपेक्षा याला महत्त्व
जॉर्ज यांच्या म्हणण्यानुसार, झुकरबर्गची आणखी एक वाईट सवय आहे, ज्यामुळे कंपनीचं नुकसान होत आहे. तो संपत्तीच्या मागे धावणारा व्यक्ती आहे. तसेच तो त्याच्या ग्राहकांपेक्षा वाढ आणि नफा याला प्राधान्य देतो. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वॉल स्ट्रीट जर्नलने केलेल्या तपासणीत इन्स्टाग्राम या ‘मेटा’च्याच सोशल मीडिया अॅपमधून मुलींना मानसिक त्रास होत असल्याचं आढळून आले. मात्र, कंपनीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. कंपन्यांनी अशा समस्या सोडवण्यास सुरुवात केली असताना, कंपनीनं नैतिक जबाबदारी टाळली आहे.
एकटे राहणे
झुकरबर्गची एक विशेष गोष्ट म्हणजे तो एकटे राहणे पसंत करतो आणि इतरांचा सल्ला घेण्यास नकार देतो. त्याच्यावर कुणी टीका केली किंवा प्रतिक्रिया दिली तरी तो ती सकारात्मकतेने घेत नाही, असेही जॉर्ज यांनी म्हटले आहे. तसेच त्याच्या जवळच्या व्यक्तीने उद्भवणाऱ्या धोक्यांचा इशारा दिला तरी तो त्याकडे दुर्लक्ष करतो, असेही त्यांनी नमूद केले आहे.
Facebook Meta Mark Zuckerberg Habits Employee