नवी दिल्ली – फेसबुकवरून पन्नास कोटींहून अधिक युजर्सची खासगी माहिती चोरल्याचा दावा एका हॅकरने केला आहे.यामध्ये फोन नंबरसह इतर माहितीचा समावेश आहे. ही सर्व माहिती हॅकरने सार्वजनिक केली आहे.
इस्त्राईलचे सायबर गुन्हे अन्वेषण संस्था फर्म हडसन रॉकचे सहसंस्थापक अॅलोन गैल यांनी शनिवारी (३ एप्रिल) सांगितले, की फेसबुकशी संबंधित टेलिफोन नंबरांचा सेट जानेवारीपासून हॅकर्सच्या सर्कलमध्ये फिरणार्या सेटशी मिळतेजुळते आहेत.
मीडिया रिपोर्टसनुसार, हॅकर्सशी टेलिग्रामवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तो झाला नाही. फेसबुकने याबाबत मागितल्या गेलेल्या कोणत्याच माहितीचे उत्तर दिलेले नाही.
गहाळ झालेला हाच डाटा आहे, जो कंपनीने ऑगस्ट २०१९ मध्ये ओळखला होता. असे या वर्षीच्या सुरुवातीला मदरबोर्डच्या रिपोर्टमध्ये म्हटलेले आहे. फेसबुक युजर्सनी आपले फोन नंबर किंवा खासगी माहिती चोरणार्या लोकांपासून सतर्क राहायला हवे, असे गैल यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले.