कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज सकाळीच छापे टाकले आहेत. मुश्रीफ यांच्या निवासस्थान, साखर कारखाना, कार्यालय येथे ईडी आणि आयकरचे पथक दाखल झाले असून ते तपासणी करीत आहेत. यासंदर्भात मुश्रीफ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
ईडी आणि आयकरचे पथकाची छापेमारी सुरू झाल्यानंतर माजी मंत्री मुश्रीफ यांनी एक व्हिडिओ प्रसारीत केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी काही कामानिमित्त बाहेर आहे. आज सकाळपासून माझे घर, कारखाना व नातेवाईकांच्या घरावर छापे सुरू आहेत. माझ्या मुलीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी शांतता राखावी. कागल बंदची घोषणा केली आहे ती कृपया मागे घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1613059500394811392?s=20&t=apXxivYZPnV_NtaL9_JtnQ
ईडी आणि आयकर विभागाचे २० अधिकारी त्यांच्या घरावर धडकले. ही बातमी वाऱ्यासाठी संपूर्ण राज्यात पसरली. आपल्या पक्षातील नेत्याच्या घरावर छापे पडल्याचे कळताच राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांनाही घाम फुटला. सकाळी साडेसहापासून मुश्रीफ यांच्या घराची झडती घ्यायला सुरुवात झाली. सर्व कागदपत्रे तपासण्यात आली. आणि यावेळी कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून बाहेर सुरक्षा जवानांचा बंदोबस्तही उभा करण्यात आला. घरातील कुणालाही बाहेर पडण्यास परवानगी नव्हती.
प्रकरण काय आहे?
अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याच्या प्रकरणात हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी आणि आयकर विभागाने छापे मारले. या बातमीनंतर केवळ राष्ट्रवादी पक्षच नव्हे तर कोल्हापुरातही खळबळ उडाली आहे. मुश्रीफ यांच्यावर शंभर कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे.
सोमय्या भेटले आणि…
विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी प्रसिद्ध असलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक दिवस आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणे आणि लगेच दुसऱ्या दिवशी हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा मारणे, या घटनाक्रमाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे. यापूर्वी हसन मुश्रीफ यांच्यामुळे अनेक नेत्यांना अडचणींना सामोरे जावे लागले आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1613062527314989057?s=20&t=QjkkDRrzHYJtBU6i2pIcIw
१०० कोटी राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची वेळ आहे का, अशी शंका व्यक्त होत आहे. अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप होता, तर हसन मुश्रीफ यांच्यावर शंभर कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. त्यामुळे शंभर कोटींचा आकडा राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणार की काय, अशी शंका व्यक्त होत आहे.
Ex Minister Hasan Mushrif Reaction After ED Raid