मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना अखेर ईडीने गाठले आहे. त्यांची दापोलीतील संपत्ती जप्त करून ईडीने ट्वीटही केले आहे. परब यांनी मात्र कारवाईशी आपला काहीच संबंध नसून असे काही असल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
अनिल परब यांचे दापोलीत रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट आणि त्याच्या आसपासच्या ४२ गुंठे जमिनीचाही समावेश आहे. एकूण १०.२० कोटी रुपयांची ही संपत्ती असल्याची माहिती ईडीने दिली आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केलेली असली तरीही मुळ तक्रार पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने केली आहे. यासंदर्भात पत्रकारांनी अनिल परब यांची प्रतिक्रिया विचारली असता, आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसून केवळ बदनामीसाठी नाव जोडण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे आपण यापूर्वीच सर्व सरकारी तपास यंत्रणांना उत्तरं दिलेली आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
अनेक वेळा चौकशी
दापोलीतील रिसॉर्टवरून अनिल परब यांची अनेकवेळा चौकशी झाली. साई रिसॉर्ट असे याचे नाव असून याप्रकरणात काही ठिकाणी छापेही टाकण्यात आले होते. पण त्यानंतर काहीच झाले नाही. विशेष म्हणजे भाजपनेते किरीट सोमय्या यांनी हा विषय लावून धरला होता.
सोमय्यांवर टिका
किरीट सोमय्या यांच्या पाठपुराव्य़ामुळे ही कारवाई झाल्याचे कळल्यानंतर ते काही न्यायाधीश नाहीत, त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायलाही मी बांधील नाही, असेही अनिल परब यांनी म्हटले आहे.उलट ईडी कोणत्या आधारावर दहा कोटीची संपत्ती जप्त केल्याचा दावा करत आहे, असा सवाल परब यांनी केला आहे. रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आहेत. त्यामुळे कारवाईवर कोणती पावले उचलायची तेच ठरवीत, असे परब यांनी स्पष्ट केले आहे.
ED has provisionally attached assets worth ₹ 10.20 Crore in connection with money laundering probe against Anil Parab, Sai Resort NX & others .
— ED (@dir_ed) January 4, 2023
Ex Minister Anil Parab Property ED Attached