इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या आलिशान बंगल्यात आयकर विभागाला मोठे घबाड गवसले आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार दिवसांपासून आयकरचे पथक या बंगल्याची झडती घेत आहे. अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. या बंगल्याच्या तळघरात तब्बल ७०० लॉकर्स सापडले असून त्यातील कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
माजी आयपीएस अधिकारी आर एन सिंग यांच्या नोएडातील बंगल्यावर आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकली. मात्र, या छापेमारीत खुद्द आयकर अधिकारीच अचंबित झाले आहेत. कारण, या बंगल्यातील संपत्तीचे शोधसत्र तब्बल ४ दिवसांपासून सुरू आहे. विभागाने तळघरातील ७०० लॉकर्समधून आतापर्यंत साडेपाच कोटी रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली आहेत. १० लॉकर्स अक्षरशः कापून त्यातील रक्कम काढण्यात आली.
सिंग यांची पत्नी आणि मुलगा हे मॅनसम व्हॉल्ट ही सुरक्षा एजन्सी चालवतात. याच एजन्सीच्या लॉकरमध्ये बेहिशोबी संपत्ती असल्याची तक्रार आयकर विभागाला प्राप्त झाली. त्यानंतर विभागाच्या पथकाने धाड टाकली. लॉकर्समधील पैसे मोजण्यासाठी अनेक मशिन्स आणावे लागले. अनेक लॉकर्स मालकांचे संपूर्ण नाव आणि पत्ता नसल्याची बाबही समोर आली आहे. अद्यापही अनेक लॉकर्सची तपासणी बाकी आहे. तर, काही बड्या व्यक्तींचे लॉकर येथे असल्याची माहिती पुढे आली आहे. आयकर विभागाचे पथक कसून शोध घेत आहे.