मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फॉक्सकॉन – वेदांत हा तब्बल दीड लाख कोटी रुपयांचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये गेला आहे. त्यावरुन सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधांकमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे व माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही तीव्र संताप व्यक्त केला. विरोध पक्ष नेते अजित पवार यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. तर, या प्रकल्पासंदर्भात नेमके काय घडले याची सविस्तर माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात हा प्रकल्प येऊ घातला होता. परंतु केंद्राकडे परवानगी मागवावी लागणार असल्याने तेव्हाच आमच्या मनात हा प्रकल्प महाराष्ट्रात येईल की नाही किंवा राहील की नाही, याबाबत शंका निर्माण झाली होती असे सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प भाजपमुळे गुजरातमध्ये गेल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर विविध राजकीय पक्षांचे नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प अचानक गुजरातला कसा गेला, तो राज्याला का मिळू शकला नाही, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले.
सध्या राज्यात फॉक्सकॉन आणि वेदांत प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याच्या प्रकरणावरुन जोरदार राजकारण सुरू आहे. ठाकरे गटकडून शिंदे सरकारवर यामुद्द्यावरुन घणाघाती टीका करण्यात येत आहे. फॉक्सकॉन आणि वेदांत हे सेमीकंडक्टर चिप निर्मितीचे प्रकल्प गुजरातला जाण्यास शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. मुळात हे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्यात येणार होते आणि यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची कंपन्यांसोबत बोलणी झाली होती. आता याच प्रकरणाची शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
सुभाष देसाई यांनी फॉक्सकॉन आणि वेदांता प्रकल्पाची मुद्देमूद माहिती व घटनाक्रम सांगत प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरलं आहे. तसंच त्यांनी एक महत्वाचा खुलासा देखील केला आहे. “फॉक्सकॉन आणि वेदांता हे सेमीकंडक्टर चीप निर्मितीचे प्रकल्प महाराष्ट्राला हवे होते. त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले होते. विशेष म्हणजे स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये मी आणि तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांनी वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासोबत चर्चा केली होती. अगदी सकारात्मक चर्चा झाली होती. खरंतर त्यावेळी गुजरात स्पर्धेतही नव्हतं. ‘फॉक्सकॉन’, ‘वेदांता’चे प्रकल्प आपल्या राज्यात आणण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि तेलंगणा स्पर्धेत होते. त्यावेळी गुजरातचं नाव कुठेच नव्हतं. मग आज अचानक गुजरातची निवड कशी झाली हा आश्चर्याचा मुद्दा आहे, असेही देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
देसाई म्हणाले की, देशात आयटी हबसाठी तीनच राज्य प्रामुख्यानं आघाडीवर आहेत. मुंबई-पुण्यातील आयटी हबमुळे महाराष्ट्र, बंगळुरूमुळे कर्नाटक आणि हैदराबादमुळे तेलंगणा राज्य स्पर्धेत होतं. यात गुजरातचा आयटी हबशी काहीही संबंध नाही. दावोसमध्ये आमची वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्याशी सविस्तर बोलणं झालं होतं आणि ते महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याच्याचे भूमिकेत होते. त्यामुळे महाराष्ट्रात हा प्रकल्प येणार याबद्दल आम्हाला आनंद वाटत होता मात्र त्याचवेळी आम्हाला केंद्राची परवानगी घ्यावी लागेल असं अग्रवाल यांनी आम्हाला बोलून दाखवलं होतं. त्यामुळे तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. आताच्या मुख्यमंत्र्यांचे केंद्राशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे शिंदे आणि फडणवीसांनी प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत”, असं देसाई म्हणाले.
केंद्राच्या महाराष्ट्र विरोधी धोरणाबद्दल कडाडून टीका करताना देसाई पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातने हिसकावण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीपासूनच महाराष्ट्राच्या वाट्याचं गुजरातनं हिरावून घेतलं आहे. राजकारणात आम्हाला पडायचं नाही. पण या प्रकल्पामुळे राज्यातील लाखो तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत. त्यामुळे आताच्या सरकारनं हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात घेऊन येण्यासाठी प्रयत्न करावेत आणि राज्याच्या भल्यासाठी शिवसेना सरकारला यासाठी मदतच करेल, असं देसाई म्हणाले. आता या प्रकल्पाचे नेमके पुढे काय होते याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.
Ex Industry Minister Subhash Desai on Foxcon Industry Developments