इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टिकली न लावल्याने महिला पत्रकाराशी बोलणे नाकारणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर टीकेची चांगलीच झोड उठली होती. भारतीय संस्कृतीपासून ते स्त्रियांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्या. हा मुद्दा थोडा थंडावतो आहे, असं वाटेपर्यंत पुन्हा एकदा उसळून समोर आला आहे. आता निमित्त आहे ते, झी मराठीवरील ‘फु बाई फु’ कार्यक्रमाचे.
टिकली लावली नाही म्हणून महिला पत्रकाराशी बोलण्यास संभाजी भिडे यांनी नकार दिला. टिकली लावली नाही तर प्रतिक्रिया देणार नाही अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या या विधानानंतर टिकली वाद चांगलाच रंगला. कलाक्षेत्रातील मंडळींनीही यावर सोशल मीडियाद्वारे आपलं मत व्यक्त केलं. झी मराठी वाहिनीने याबाबतच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘फु बाई फु’ हा कार्यक्रम ‘झी मराठी’ वाहिनीवर पुन्हा सुरू झाला आहे. या कार्यक्रमादरम्यानचाच एक व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये टिकलीबाबत भाष्य करण्यात आलं आहे. स्किट सादर करणारी अभिनेत्री नवऱ्याला म्हणते, “मी म्हणजे बाई ना… टिकली लावायची की नाही लावायची हे बाईला ठरवू द्या. टिकली म्हणजे नवरा जिवंत असल्याचं प्रतीक आहे का? मग एरवी मी टिकली आरशाला लावून आंघोळीला जाते तेवढ्या वेळात तुम्ही आरशाला येऊन चिकटता का? मेकअप करताना मी कितीवेळ बिना टिकलीची असते. तेवढ्या वेळात कोमात जाता की काय? आपलं हे नातं प्रेमावर टिकलं आहे टिकलीवर नाही.”, असा काहीसा यातील आशय आहे.
मात्र, हा व्हिडीओ पोस्ट होताच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. हिंदू असल्याचा अभिमान बाळगा, आपल्याच धर्माची खिल्ली उडवणे योग्य नाही. टिकली हा हिंदू मुलींचा स्वाभिमान आहे. अशा व्हिडीओजमधून हिंदू धर्माचा अपमान होत असल्याची टीका देखील अनेक प्रेक्षकांनी केली आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ आता इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन डिलीट करण्यात आला आहे.
Entertainment Women Tikli Zee Marathi Video
Fu Bai Fu