नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. त्याविरोधात ठाकरे गटाने आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत या प्रकरणाची सुनावणी घेण्याची मागणी उद्धव गटाच्या वकिलांनी केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या वकिलांना सांगितले की, उद्या या प्रकरणाचा उल्लेख करावा. त्यामुळे तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
शिवसेनेची कमान, नाव आणि निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडून हिसकावून घेतल्यानंतर एकनाथ शिंदेही स्वस्थ बसलेले नाहीत. शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवण्यासाठी ते त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व हालचाली करत आहेत. एक दिवसापूर्वीच शिंदे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट याचिका दाखल करण्यात आली आहे.. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी उद्धव गट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, असे या याचिकेत म्हटले आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणी कोणताही निकाल देण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आमचाही युक्तिवादही ऐकून घेतला पाहिजे, असे कॅव्हेटमध्ये म्हटले आहे.
ठाकरे गटाच्या वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. निवडणूक आयोगाचा निर्णय हा अयोग्य असून याप्रकरणी तातडीने सुनावणी घ्यावी, अशी आग्रहाची विनंती ठाकरे गटाच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. मात्र, याप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. उद्यापासून सत्तासंघर्षाची सलग सुनावणी आहे. त्यामुळे त्याच सुनावणीत हे प्रकरण मांडावे, असे न्यायालयाने ठाकरे गटाच्या वकीलांना सांगितले आहे. त्यामुळे आता या प्रश्नीही न्यायालयात काय घडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/LiveLawIndia/status/1627542142209122304?s=20
Election Commission Order Uddhav Thackeray Supreme Court