नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना मोठा दणका दिला आहे. शिवसेना पक्ष नेमका कुणाचा आणि या पक्षाची निशाणी असलेल्या धनुष्यबाण याबाबत आयोगाने आज मोठा निर्णय घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करीत मोठी फूट पडली आहे. आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाने केला होता. याचाच एक भाग म्हणून शिंदे गटाने निवडणूक आयोगात धाव घेतली. अखेर आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटाला नोटीस बजावली आणि आपले म्हणणे मांडण्यास सांगितले. दोन्ही गटांनी त्यांची बाजू मांडली, प्रतिज्ञापत्र सादर केले आणि काही पुरावेही दिले. अखेर आता यावर आयोगाने आज निर्णय घेतला आहे. निवडणूक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तब्बल चार तासांच्या बैठकीनंतर आयोगाने त्यांचा निर्णय जाहीर केला आहे. यात आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटाला मोठा दणका दिला आहे.
आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी (१० ऑक्टोबर) दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहे.
आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा फटका बसणार आहे. कारण अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे. शिंदे गटाने भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला आता शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाशिवाय ही निवडणूक लढवावी लागणार आहे.
https://twitter.com/LiveLawIndia/status/1578775899809656832?t=07kJp-HubogbETNJpVx4bw&s=19
Election Commission order Shivsena shinde thackeray group
Politics