मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, पण त्यांची चावी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात आहे, असे कायम बोलले जाते. त्यासाठी अगदी पहिल्या पत्रकार परिषदेपासून ते अलीकडच्या काळापर्यंत अनेक घटनांचे संदर्भ दिले जातात. त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. लाईव्ह पत्रकार परिषदेत शिंदेंनी फडणविसांना काहीतरी विचारले आणि त्यावर त्यांनी स्पष्ट नकार दिला.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये पत्रकार परिषदेत झालेल्या चर्चेचा हा व्हिडियो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. दोघांमधील चर्चा कॅमेरात कैद झाली आणि त्यांच्यात झालेला संवादही सर्वांना स्पष्ट ऐकू येत होता. दोघांनाही टार्गेट करण्यासाठी विरोधकांना आणखी एक संधी मिळाली आहे. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. वाचण्यासाठी त्यांची घालमेल सुरू असताना दिसते. अश्यात ते देवेंद्र फडणवीस यांना ‘वाचू का?’ असा प्रश्न विचारतात आणि फडणवीस थेट ‘नाही काही गरज नाही’ असे उत्तर देतात. हे सारे कॅमेरात रेकॉर्ड झाले आणि पुढे उपस्थित पत्रकारांनीही स्पष्ट ऐकले. त्यामुळे काही क्षणात त्याचे वार्तांकन आणि व्हिडियो संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
ही तर गुलामी
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना ‘वाचू का?’ असे विचारत असतील तर ती सपशेल गुलामी आहे. यालाच खरी गुलामी म्हणतात आणि याच गुलामीच्या विरुद्ध सावरकरांनी आपलं अख्खं आयुष्य अंदमानात घालवलं, हे सत्ताधाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
बालवाडीतलं लेकरूही बोलू लागतं
या व्हिडियोवरून विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. आता सरकारला नऊ महिने झाले आहेत. एवढ्या दिवसांमध्ये तर बालवाडीतील लेकरुसुद्धा बाराखडी बोलू लागतं, असं ते म्हणाले. अलीकडेच मी राजस्थानात कठपुतलीचा खेळ पाहून आलो आणि आता मुंबईत ही असाच एक शो झाल्याचं मला कळलं, असं ट्वीटदेखील त्यांनी केलं आहे.
https://twitter.com/iambadasdanve/status/1640352704395444224?s=20
Eknath Shinde Devendra Fadnavis Press Conference Video Viral