धाराशिव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडीचा ३० डिसेंबरला मंत्रीमंडळ विस्तार झाला. त्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दूर ठेवले. त्यामुळे संतप्त होऊन आपण देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने ३ जानेवारीला राज्यात पहिली बंडखोरी केली. भाजपच्या साथीने धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप युतीची अधिकृत सत्ता स्थापन केली. त्यानंतर सलग दोन वर्षे हे सरकार पाडण्यासाठी कामाला लागलो. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यासोबत सतत बैठका झाल्या. जवळपास १०० ते १५० बैठका झाल्या, असा गौप्यस्फोट राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे.
महाविकास आघाडी अर्थात मविआचे सरकार स्थापन झाल्यानंतर तीनचाकी रिक्षा किती दिवस चालणार, याबाबत शंकाकुशंका व्यक्त करण्यात येत होतात. तीनही पक्षातील नेते नाराज होते. लाभाचे पद मिळावे यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेल्या तानाजी सावंत यांनी नाराजी व्यक्त करत थेट स्वत:च्या पक्षालाच सुरुंग लावला. त्याबाबतचा खुलासा त्यांनीच केला असून मविआ सरकार पाडण्यासाठी सुमारे १५० बैठका घेतल्याचे सावंत म्हणाले आहेत.
जिल्ह्यातील परंडा येथे भैरवनाथ केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेदरम्यान सावंत यांनी ठाकरे सरकार पाडण्यासाठी आपण व्युव्हरचना आखल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल नाकारला. भाजप-शिवसेना युतीला कौल दिलेला असताना शरद पवार यांनी त्यात मिठाचा खडा टाकला. आणि जनमत डावलून पक्षप्रमुख ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केली. त्या सरकारमध्येही आपल्याला स्थान दिले नाही. त्यामुळे मातोश्रीवर जाऊन ‘त्यांना’ सांगून आलो की मी आता पुन्हा या मातोश्रीची पायरी चढणार नाही, असे सावंत म्हणाले.
Politics Tanaji Sawant Thackeray Government Conspiracy