मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. याचसंदर्भात आता शिंदे-फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांच्यावतीने राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढली जाणार आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1640299025692803078?s=20
शिंदे आणि फडणवीस म्हणाले की, राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरू करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्याग, त्यांचे देशाप्रती असलेले समर्पण आणि त्यांच्या जिवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारी ही यात्रा असेल. ती प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात सुरू करणार आहोत.
यावेळी शिंदे आणि फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राहुल गांधींकडून वारंवार अपमान केला जातो आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळून दिले आहे. त्यांचे योगदान मोठे आहे. अंदमानमध्ये त्यांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1640299103014772737?s=20
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संयुक्त निवेदन Dms
आमचे आदर्श, स्वातंत्र्यानंतर सुद्धा यातना सहन करावे लागलेले एकमात्र आणि ज्यांनी एक नव्हे तर दोन वेळा काळ्यापाण्याच्या शिक्षा भोगल्या, असे थोर क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही, असा पोकळ दम श्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर काल दाखविले गेले. वस्तुतः राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताना आणि समाप्तीच्या वेळी सुद्धा दोन वेळा राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांना अपमानित करण्याची भूमिका घेतली आणि त्यावर श्री उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या आमदारांनी मौन राहणेच पसंत केले. चकार शब्द उच्चारला नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यसमराव्यतिरिक्तही अनेक क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान दिले. जाती निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, मराठी भाषेचा गौरव, मराठी भाषेला अनेक शब्द देण्याचे काम त्यांनी केले. कितीतरी क्षेत्रात त्यांनी योगदान दिले. प्रत्येक देशवासी त्यांच्या अतुलनीय योगदानाचा ऋणी आहे. संपूर्ण देश आणि विशेषतः महाराष्ट्र त्यांचे योगदान कधीच विसरू शकणार नाही.
काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली असताना त्यांचा अत्यंत हिरीरीने बचाव करताना मात्र श्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे आमदार दिसून आले. असे करताना त्यांना वीर सावरकर यांचा अपमान दिसला नाही. हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आमदारांच्या शरणागतीचा परमोच्च बिंदू होता.
आता जाहीर सभेत वक्तव्ये करून जनतेची दिशाभूल करण्याचा अत्यंत बालिश आणि जनतेला मूर्ख समजण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. पण जनतेने तुमचा दुटप्पीपणा ओळखला आहे. तुम्ही बोलत रहा, आम्ही मारल्यासारखे करतो, असाच हा केविलवाणा प्रयत्न श्री उद्धव ठाकरे यांनी चालविला आहे. उद्धव ठाकरे एकीकडे ही विधाने करीत असताना दुसरीकडे त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे मात्र, ‘दोन्ही पक्ष वेगळे आहेत आणि ती काँग्रेस पक्षाची भूमिका आहे’, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत करतात. म्हणजेच कुणी काय बोलावे, हेही घरात बसून ठरविल्यासारखे आहे. त्यामुळे श्री उद्धव ठाकरे यांनी आता अशी कितीही मल्लिनाथी केली, तरी त्याचा काहीही फायदा नाही. आपली प्रेरणास्थाने जेव्हा अपमानित होतात आणि तेव्हाही आपण मूग गिळून गप्प बसतो, तेव्हा तो राजकारणातील हताशेचा, अनुनयाचा, हतबलतेचा परमोच्च बिंदू असतो. अशा अवस्थेत त्याचा निषेध करून तरी काय उपयोग?
राहुल गांधी यांचा मात्र आम्ही तीव्र निषेध करतो. या अपमानाविरोधात राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येतील आणि ठिकठिकाणी राहुल गांधी यांचा निषेध करण्यात येईल.
Eknath Shinde Devendra Fadnavis Joint Press Conference
Savarkar Gaurav Yatra