इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने मीरा-भाईंदर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलन ‘ या सत्संग सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून गोमाता पूजन आणि धनुष्याचे पूजन केले. या सोहळयात जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज उपस्थितीत होते. काही दिवसापूर्वी अविमुक्तेश्वरानंद महाराजांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. विश्वासघातकी आणि देशद्रोही म्हणत शिंदेच्या बंडावर त्यांनी भाष्य केले होते. पण, आज त्यांनी धनुष्यबाण हातात घेतला. तसेच गाईबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतूक करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, माजी आमदार रवींद्र फाटक आणि मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. या सत्संग सोहळ्यासाठी आमंत्रित केलेले जगद्गुरू शंकराचार्य स्वामीजी सदानंद सरस्वतीजी महाराज, जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज, जगद्गुरू रामनुजाचार्य स्वामिश्री वसुदेवाचार्य विद्यासागरजी महाराज, स्वामी गोविंद देवगिरी महाराज, श्रीकृष्ण कथा प्रवचनकार श्री अनिरुद्धाचार्य महाराज आणि गजानन ज्योतकर गुरुजी यांना सन्मानित केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आजच आमच्या सरकारने गायीला राज्य मातेचा दर्जा दिला असल्याचे आवर्जून सांगितले. हा भागवत सत्संग समारंभ हे हिंदूत्वाचे जागरण आहे. सर्व साधू संत एकत्र आल्याने आजच दिवाळी दसरा सण साजरा झाला आहे. त्यामुळे या भागवत सत्संग सोहळ्याला उपस्थित राहून नवरात्रीच्या अगोदर दसरा साजरा केल्याचा आनंद मिळत असल्याचे यावेळी सांगितले.
धर्म आणि अध्यात्म आम्ही मानतो. धर्माचे अधिष्ठान हे सत्तेच्या अधिष्ठानापेक्षा कायमच मोठे आहे. मी स्वतः सच्चा धर्मवीरांचा कार्यकर्ता आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांकडे अनेक साधू संत यायचे व दिघे साहेब त्यांना स्वतः दान धर्म करायचे आणि मी स्वतः देखील तोच मार्ग निवडला आहे. आमच्या कार्यकाळात एकही साधूची कधी हत्या झालेली नाही. जनतेची सेवा आणि सनातन हिंदू धर्माचे रक्षण करणे हे आमचे परम कर्तव्य असल्याचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.