निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयातून पळून जाताना अडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या इसमास न्यायालयाने तब्बल आठ वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत पोलीस कार्यक्षेत्रामध्ये खून केल्याचा आरोप असलेल्या मधुकर विजय माळी (रा. मालेगाव) या आरोपीस निफाड येथील जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाने ७ जानेवारी २०१७ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई दीपक लोंढे यांनी आरोपीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने लोंढे यांच्या पायावर लाथ मारून त्यांना जायबंदी केले आणि त्यांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच निफाड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेऊन आरोपीस जेरबंद केले.
तत्कालीन तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी आपले सहकारी मनोज आहेर, गायकवाड आणि बिडगर यांच्या मदतीने या प्रकरणाचा बारकाईने तपास करून सदर आरोपी विरुध्द सरकारी कामकाजात अडथळा आणणे शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचे काम करण्यास अटकाव करणे आणि सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यास मारहाण करणे दुखापत करणे अशा विविध कलमाखाली न्यायालयात त्याचे विरुद्ध आरोपपत्र सादर केलेले होते.
सहा वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर या खटल्याचा निकाल लागलेला असून निफाड येथील जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश बी.डी. पवार यांनी सदर आरोपीवरील आरोप सिद्ध होत असल्याने त्यास कलम ३५३ नुसार पाच वर्षे कलम ३२४ नुसार दोन वर्षे आणि कलम ३३३ नुसार एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा तसेच आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील म्हणून अॅड. श्रीमती बंगले यांनी कामकाज बघितले.