कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी आज पहाटेच सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापा टाकला आहे. गेल्या दीड महिन्यात ईडीचा हा तिसरा छापा आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे मुश्रीफ समर्थक अतिशय संतप्त झाले आहेत. मुश्रीफ यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे. तसेच, याठिकाणी आता पोलिस छावणीचे रुप आले आहे. पोलिसांचा मोठा बंदबोस्त येथे तैनात करण्यात आला आहे.
कागलमधील मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक आज पहाटेच दाखल झाले. ईडीचे अधिकारी घरी आले त्यावेळी मुश्रीफ घरी नसल्याचे सांगितले जात आहे. घरात केवळ महिला आणि लहान मुले असल्याचे सांगितले जात आहे. ईडीच्या छाप्याची माहिती मिळताच मुश्रीफ समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय संतप्त आहेत. ईडीच्या छाप्यानंतर मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा यांनी घराबाहेर येऊन पहिली प्रतिक्रीया दिली आहे. त्या म्हणाल्या की, किती वेळा यायचं या ठिकाणी? किती त्रास द्यायचा काही आहे की नाही? रोज उठून तेच सुरू आहे, एवढं काम करणारा माणूस आहे, रात्रंदिवस जनतेसाठी राबणारा माणूस आहे आणि असं का करता? आम्ही करायचं तरी काय, आम्हाला एकदाचं गोळ्या घालून जायला सांगा, असे सांगताना त्यांच्या भावना अनावर झाल्या.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचप्रकरणात त्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने मुश्रीफ यांना कालच दिलासा दिला होता. आणि आता आज ईडीने कारवाई केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
#ED #Raid on #NCP #Leader #HasanMushrif #Home in #Kolhapur