मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवेंद्र फडणवीस यांचा गेल्या नऊ वर्षांत मुख्यमंत्री-विरोधीपक्षनेता-उपमुख्यमंत्री असा प्रवास झाला. पण तरीही २०१४ च्या निवडणुकीतील एक प्रकरण त्यांचा पिच्छा सोडत नाहीये. हे प्रकरण निवडणूक शपथपत्रात गुन्ह्यांची माहिती लपविण्याच्या संदर्भातील असून गेल्या नऊ वर्षांत यावर अनेकदा सुनावणी झाली आहे. आता पुन्हा एकदा न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात फडणवीस यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल दोन गुन्ह्यांची माहिती दडवली, असा दावा करणारी याचिका अॅड. सतीश उके यांनी दाखल केली आहे. याप्रकरणी मंगळवारी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी संग्राम जाधव यांनी सर्व पक्षांची बाजू ऐकूण घेत निर्णय राखून ठेवला. यावर ते ५ सप्टेंबरला निर्णय देणार आहे. सुनावणीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांचे वकील सुबोध धर्माधिकारी यांनी सांगितले की ‘नजर चुकीने हे गुन्हे शपथपत्रात नमूद करण्याचे राहून गेले होते. गुन्ह्यांविषयी माहिती न देण्याचा कोणताही वाईट उद्देश नव्हता. तसेच प्रत्येक निवडणूकीला फडणवीस यांना मिळणाऱ्या मतदानाची संख्या ही वाढतच आहे.’ देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे अॅड. सुबोध धर्माधिकारी, अॅड. उदय डबले, अॅड. देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली तर अॅड. सतीश उके यांनी कारागृहातून व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे बाजू मांडली.
गुन्हा दाखल व्हावा
फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे करण्यात आली आहे. यापूर्वी अॅड. उके यांच्या बाजूने युक्तीवादाची तसेच साक्षी पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. मंगळवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी संग्राम जाधव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. आता ५ सप्टेंबर रोजी निर्णय दिला जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणात काय होईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे
Devendra Fadnavis problems will increase?
DYCM Devendra Fadnavis Court Order Case BJP Politics
Nagpur Legal Verdict Election Affidavit