महापुरूषांचे पुतळे लावण्यासाठी रीतसर परवानगी बंधनकारक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – “राज्यातील कोणत्याही गावात किंवा शहरात राष्ट्रपुरूष किंवा थोर व्यक्ती यांचे पुतळे उभारण्यास रीतसर पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. राजापूर, ता. येवला येथील गावातील चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन केल्याबद्दल गुन्हे दाखल केल्याबाबत सदस्य नरेंद्र दराडे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले, “कोणत्याही शहरात किंवा गावात थोर महापुरूषांचे पुतळे स्थापन करण्यास मनाई नाही. मात्र पुतळा बसविण्यासाठी रीतसर पूर्व परवानगी घ्यावी लागते. याबाबत शासनाने पुतळा बसविण्याविषयी कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्वे विहित केली आहेत. राजापूर-ममदापूर चौफुली येथे ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये काही व्यक्तींनी परवानगी न घेता आणि विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा स्थापन केला होता. यामुळे या तरूणांवर आदेशाचा भंग केल्याने गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला होता.
लोकप्रतिनिधी अवमान प्रकरणी पोलिसांना पाठिशी घालणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
येवला मर्चंट बँक निवडणुकीसाठी नियमानुसार पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला होता. निवडणूक प्रक्रियेदरम्यान काही लोकप्रतिनिधींना पोलीस अधिकाऱ्यांकडून धक्काबुक्की केली असेल किंवा हीन वागणूक दिली असेल तर खपवून घेतली जाणार नाही, अशा पोलीस अधिकाऱ्याला पाठिशी घालणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. येवला मर्चंट बँक निवडणुकीत पोलीस निरीक्षकांनी पॅनल प्रमुखांना धक्काबुक्की, शिवीगाळ, मारहाण केल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य किशोर दराडे यांनी मांडली होती.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी विधानपरिषद सदस्य यांना आणि कार्यकर्त्यांना मतदान झाले असेल बाहेर थांबण्यास सांगितले होते. यावेळी वाद निर्माण होऊन धक्काबुक्की झाली होती याबाबत विधानपरिषद सदस्यांनी पोलीस निरीक्षक श्री. मथुरे यांच्याविरूद्ध पोलीस महासंचालक आणि नाशिकचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांच्यामार्फत वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात येत आहे. चौकशीला अडथळा येऊ नये, यासाठी त्या पोलीस अधिकाऱ्याची दुसरीकडे बदली करण्यात येईल.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1607722087103492099?s=20&t=M587LFlvcjTZxmdFow_rqA
DYCM Devendra Fadanvis on Yeola two Questions
Nashik Maharashtra Winter Assembly Session Nagpur