कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खाणं काढणे याप्रमाणे पगार काढणे अशीही एक म्हण प्रचलित आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन आयोगासाठी खूप आंदोलने होतात. त्यांना तो लागूही होतो. तरीही पाहिजे तशी कामे होत नाहीत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक जबरदस्त विधान करून सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारच काढला आहे.
सरकारवर एकीकडे लोकोपयोगी योजना राबविणे आणि त्यासाठी खर्च करण्याचे आव्हान आणि दुसरीकडे तिजोरीत ठणठणाट आहे. कुठलेही सरकार आले तरी तिजोरी रिकामी असल्याची तक्रार कायमच असते. पण आता अजितदादांनी सरकारी कर्मचारी आणि खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तुलना केली आहे. विशेष म्हणजे ही तुलना कामाच्या नव्हे तर पगाराच्या बाबतीत केली आहे. शासकीय कर्मचार्यांच्या वेतनावर होणारा खर्च प्रचंड असून एका कर्मचार्याच्या पगारात खासगी कंपनीचे तीन कर्मचारी काम करू शकतात.
राज्याचे वार्षिक बजेट साडेपाच ते सहा लाख कोटींचे असून यापैकी २ लाख ४० हजार कोटींचा खर्च केवळ वेतनावर होतो, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. त्यांच्या या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकारी कर्मचारी जाहीरपणे बोलू शकत नसले तरीही त्यांच्यातही कुजबुज सुरू झाली आहे. कोल्हापूरला जात असताना डेमोक्रेटिक पक्षाच्या शिष्टमंडळाने शासकीय नोकरभरती खासगी कंपनीऐवजी शासनामार्फत करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली.
तुम्ही मुख्यमंत्री झालात तरीही…
राज्यातील शासकीय नोकरांचे पगार, भत्ते, महागाई वाढत आहे. यामुळे जर सर्वच ठिकाणी शासकीय कर्मचारी नियुक्त केले तर तुम्ही मुख्यमंत्री झालात तरी राज्याचा सर्व महसूल केवळ पगारावर खर्च होईल. मग रस्ते व अन्य विकास कामासाठी निधी कुठला येणार? खासगी कंपन्याकडून मनुष्यबळ घेणे आम्हालाही पटत नाही. मात्र, उत्पन्न आणि खर्च याचा मेळ घालणे गरजेचे आहे, असे अजित पवार या चर्चेमध्ये म्हणाले.
सरकारी भरती होणार
राज्य सरकारकडून तलाठी, पोलीस, वैद्यकीय विभाग आदींमध्ये १ लाख ३० हजार जागा भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आता नोकर भरतीसाठी खासगी कंपनीकडून परीक्षा प्रक्रिया राबविली जाणार नाही, तर ती सरकारच राबवेल, यासंदर्भातही विचार सुरू असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
DYCM Ajit Pawar Government Employee Salary