मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आवडीचे चॅनल दाखविण्याच्या मोहामध्ये सारे भारतीय अडकले आणि नंतर हे फार महागाचे काम आहे हे हळूहळू कळायला लागले. आता तर डीटीएचच्या रिचार्जमध्ये आणखी वाढ होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम डीटीएच करणार आहे, असे चित्र आहे.
डीटीएच आले तेव्हा ती योजना दिसायला छान वाटली. पण अचानक रिचार्जचे दर दुप्पट करण्यात आले. तो ग्राहकांसाठी पहिला धक्का होता. आता तर महागाईच्या नावाखाली प्रत्येक सेवा महाग करण्याची मालिकाच सुरू झाली आहे. डीटीएचनेही तसेच केले. सुरुवातीला बेसिक चार्जेस कायम ठेवले. त्यामध्ये कुठलेही चॅनल ग्राहकांच्या पसंतीचे नव्हते. मग आवडीचे चॅनल बघण्यासाठी त्यावरचे पैसे जोडत गेले. आणि शेवटी डीटीएच सेवा जीएसटी जोडून भक्कम पैसे वसुल करू लागली.
आता डीटीएचचे दर आणखी वाढणार असल्याचे कळते. नवीन टॅरिफ ऑर्डर ३.० चा ग्राहकांवर थेट परिणाम होईल असे दिसत आहे. अर्थात एकाचवेळी ही किंमत वाढणार नाही. टीव्ही सबस्क्रिप्शनसाठी प्रती ग्राहक किंवा एआरपीयू सरासरी कमाई २२३ रुपये आहे. टाटा प्ले ने एक ते दिड महिन्यात दर वाढविण्याची घोषणा केली आहे. ५ ते ६ टक्क्यांची दरवाढ असेल, असा अंदाज आहे.
नाहीतर जास्तीची वाढ
डीटीएचचे दर वाढणार असले तरीही त्याची एक मर्यादा आखण्यात आली आहे. कारण गेल्या वर्षभरात मोठा ग्राहकवर्ग ओटीटीकडे वळला आहे. समजा हे दर आणखी वाढवले तर आणखी ग्राहक ओटीटीकडे वळतील, याची भीती डीटीएच सेवेला आहे.
टप्प्याटप्प्याने धक्का
डीटीएच सेवेतील वाढ हळूहळू होणार आहे. ग्राहकांना दरमहा २५ ते ३० रुपयांचा भार सोसावा लागेल, असे ईटीच्या अहवालानुसार लक्षात येत आहे. अशात एकाचवेळी दर वाढवले तर ग्राहकांची नाराजी ओढवून घेतल्यासारखे होईल. त्यामुळे ग्राहकांना टप्प्याटप्प्याने धक्के देण्यात येणार आहेत.
DTH Recharge Will Be Expensive Soon