बगदाद (इराक) – पंतप्रधान मुस्तफा अल-कादिमी यांच्या निवासस्थानावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने हल्ला करण्यात आला आहे. मात्र, इराकचे पंतप्रधान या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. आज रविवारी सकाळी हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, इराकी लष्कराने हा पंतप्रधानांच्या हत्येचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. मात्र, अल अरेबियाच्या वृत्तानुसार या हल्ल्यात काही लोक जखमी झाले आहेत.
इराकी लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर भयानक हल्ल्यामध्ये कादिमी यांच्या बगदाद येथील निवासस्थानाच्या ग्रीन झोनला लक्ष्य करण्यात आला. मात्र, यावेळी लष्कराकडून कोणतीही अतिरिक्त माहिती देण्यात आलेली नाही. अन्य दोन सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, कादिमी यांच्या निवासस्थानावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने हल्ला केला. पंतप्रधान कादिमी या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. त्याचबरोबर कदिमी यांनी हल्ल्यानंतर आपण सुरक्षित असल्याचे ट्विट केले आहे. त्याच वेळी त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे.
आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या ग्रीन झोन परिसरात सरकारी इमारती आणि परदेशी दूतावास आहेत. येथे राहणाऱ्या पाश्चात्य राजदूतांनी सांगितले की त्यांनी स्फोट आणि गोळीबार ऐकला. इराणसह सशस्त्र गटांनी गेल्या महिन्यात ग्रीन झोनजवळ झालेल्या संसदीय निवडणुकांच्या विरोधात अलिकडच्या आठवड्यात निषेध केला आहे. त्यामुळे हा हल्ला झाला असावा.
https://twitter.com/AlHadath/status/1457249019705667585