इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष –
आज आहे नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन – असे आहे महत्त्व
आज सोमवार दिवाळीचा चौथा दिवस. या वर्षी नरक चतुदर्शी आणि दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले आहेत. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते, तर दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते आणि तिसऱ्या दिवशी दिवाळी मात्र यंदा नरक चतुदर्शी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे या दिवशी विशेष योग असणार आहेत.
यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दिवाळीचे महत्वाचे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. पहाटे आपण नरक चतुर्दशी चे अभ्यंगस्नान करणार आहोत तर सायंकाली लक्ष्मीपूजन करणार आहोत. पौराणिक परंपरेनुसार, दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्री गणेशांची पूजा केली जाते.
आख्यान नरक चतुर्दशीचे
नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन या दोन्ही दिवसांमागे मोठी परंपरा आहे. पौराणिक काळपासून हे दोन्ही दिवस साजरे केले जातात. नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले.
गेल्या अनेक वर्षांपासून नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे पाच साडेपाच ते सकाळी ६ या वेळात नरकासुर वधाचे आख्यान लावले जाते. अनेकांना ते आख्यान आजही जसेच्या तसे आठवते.
नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा – म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही – असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता.
अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे.
या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान. या दिवशी पहाटे यमासाठी नरकात, म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे. वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु इ. ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेऊन त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी.
नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते, तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्नादिवशी उडवून संपवतात.
लक्ष्मीपूजन
दिवाळीतील सर्वांत महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा !आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते.या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते.
या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.केरसुणीने घर स्वच्छ होवून घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्य्र दूर होते असे मानले जाते.
प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. भारतात, विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिस्थापित केले गेले.
लक्ष्मी पूजन कसे करावे?
सर्वप्रथम पूजा करण्यापूर्वी संपूर्ण घर स्वच्छ करावे. घरातील पूजेच्या ठिकाणी एक चौरंग किंवा पाट ठेवून त्यावर लाल वस्त्र अंथरुन ठेवावे. त्यावर देवी लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ति स्थापन करावी. त्यांची विधीवत पूजा करावी. मूर्तीला कुंकू, हळद, अक्षता, फुलं, मिठाई, धूप आणि दीप अर्पित करावे. देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा. त्यानंतर त्यांची आरती करावी.
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती ‘ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, ही या पूजेची विशेषता आहे.
शुभ मुहूर्त
कार्तिक अमावस्या तिथी प्रारंभ : २४ ऑक्टोबर, संध्याकाळी ०५.२७
कार्तिक अमावस्या तिथी समाप्त : २५ ऑक्टोबर, संध्याकाळी ०४.१८
लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त : संध्याकाळी ०५.२९ ते ०७.१८ पर्यंत, रात्री १०.२९ ते १२.०५ पर्यंत
जैन धर्मियांचे मोक्ष लक्ष्मी पूजन
भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्यांचा दिव्य-ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात.
दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला ‘मांडणे’ असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात.
(संदर्भ – पौराणिक ग्रंथ)
Diwali Special Laxmipujan and Narak chaturdashi by Vijay Golesar