मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणातही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या होत्या. या प्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंपासून अनेकांनी गंभीर आरोप केले होते. राणेंनी या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावरदेखील गंभीर आरोप केले होते. आता मात्र या प्रकरणात सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. सीबीआयने सादर केलेल्या अहवालात दिशाचा मृत्यू अपघातीच होता, हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दिशाची आत्महत्या झाल्याचा, बलात्कार झाल्याचा आणि खून झाल्याचे सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एकेकाळची मॅनेजर दिशा सालियनचा सुशांतचा मृत्यू होण्याच्या काही दिवसांआधी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचं म्हटलं गेलं. नंतर पुढे या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आणि दिशावर सामूहिक बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप झाला. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. आता सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून आपला अहवाल सादर केला आहे. सीबीआयने दिलेल्या अहवालात दिशा सालियनचा दारूच्या नशेत तोल गेल्याचा आणि १४ व्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं आहे.
प्रकरणात राजकीय आरोप
ही घटना घडल्यानंतर नारायण राणेंनी दिशा सालियान खून प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा सालियानचा खून झाला. तिच्यावर अत्याचार करून खून झाला. त्या प्रकरणातील आरोपींना का अटक झाली नाही. कोण मंत्री होता, त्याला का वाचवण्यात आलं, सचिन वाझेंना पोलीस खात्यात आणून त्या मंत्र्याला वाचवलं, असे आरोप नारायण राणेंकडून करण्यात आले होते. दिशा सालियान, सुशांत सिंह राजपूतबाबत केलेलं पाप विसरता येणार नाही. आता तुमची सत्ता नाही. त्यामुळे त्यातील आरोपी पकडले जातील, असा इशारा देखील नारायण राणेंनी दिला होता.
Disha Salian Death Case CBI Investigaion Report
Accidental