मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत सांगली जिल्ह्यातील मिरज येथील शासकीय निवासी संस्थेत दिव्यांग (अस्थिव्यंग) बालकांना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असून मोफत प्रवेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
मोफत शिक्षण सुविधेमध्ये संस्थेच्या परिसरात पहिली ते चौथीपर्यंतचे मोफत प्राथमिक शिक्षण, इयत्ता 5 वी पासून पुढील शिक्षण माध्यमिक शाळेमार्फत, माध्यमिक शाळेत जाण्यायेण्याकरिता मोफत वाहतुकीची सुविधा, पाठ्यपुस्तके वह्या, इतर शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेश मोफत देण्यात येणार आहे. मुलींसाठी विशेष काळजी घेण्यासाठी महिला काळजीवाहक आहेत.
वसतिगृह सुविधेमध्ये दिव्यांग मुला- मुलींची स्वतंत्र निवास व्यवस्था व मोफत जेवण, प्रत्येक विद्यार्थ्यांस कॉट, गादी, बिछाना व इतर साहित्याचा मोफत पुरवठा, दररोज आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय, शुद्ध व थंडगार पाण्याची सुविधा पुरविण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया भौतिकोपचार सुविधेमध्ये अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गरजेनुसार शस्त्रक्रिया व भौतिकोपचाराची सुविधा, गरजेनुसार कृत्रिम अवयव, कुबड्या, तीन चाकी सायकल वाटप,वयोगट शून्य ते सहाकरिता मोफत भौतिकोपचार करण्यात येतील.
प्रवेशाबाबतच्या अटींनुसार प्रवेशित अस्थिव्यंग असला पाहिजे, वयोगट 6 ते 17 वर्षे, प्रवेश अर्जासोबत सिव्हील सर्जन यांनी दिलेल्या दिव्यांगाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, तीन फोटो आवश्यक आहेत. प्रवेश अर्ज व माहितीपत्रक पत्त्यावर समक्ष अथवा पोस्टाव्दारे मोफत मिळतील. अधिक माहितीसाठी अधिक्षक, शासकीय दिव्यांग बालगृह व शाळा, किल्ला भाग, बीएसएनएल ऑफिस शेजारी मिरज – 416410 जि. सांगली या पत्त्यावर संपर्क साधावा. तसेच भ्रमणध्वनी क्रमांक 9325555981, 9552234586, 9422216459 यावर संपर्क साधता येणार आहेत.