कोपरगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांमध्ये देशभरातील विविध राज्यांमध्ये लव्ह जिहादच्या घटना वाढल्या असून त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. या संदर्भात काही राज्यांनी कठोर कायदे केले असले तरी अद्यापही काही राज्यांमध्ये असे प्रकार सुरूच आहेत. मध्य प्रदेशातील एका तरुणाने नगर जिल्ह्यातील २० वर्षीय तरूणीशी इंस्टाग्रामवरून ओळख करून तिचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणाने या तरूणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले. या फोटो आणि व्हिडिओचा वापर करून त्याने तिला सतत ब्लँकमेल केले.
असे ओढले प्रेमाच्या जाळ्यात
सोशल मीडियाचा वापर गैरवापर करण्याचे प्रकार समाजात वाढले आहेत. विशेषतः तरुणांकडून विकृतपणे याचा वापर करण्यात येतो. मुळचा मध्यप्रदेशातील इंदूर येथे राहाणारा सायम याने ३ वर्षापूर्वी कोपरगाव येथील २० वर्षीय तरूणीशी इंस्टाग्रामवरून संपर्क केला. त्यानंतर त्याने सतत संपर्क करून तिच्याशी मैत्री केली. यानंतर दोघांनी एकमेकांना फोन नंबर दिले. सुरुवातीला मैत्री केलेल्या सायम याने नंतर तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
तो कोपरगावला आला
२१ मे २०२३ रोजी तो कोपरगाव येथे आला आणि तरुणीला भेटायला बोलवलं. ती भेटायला आली तेव्हा त्याने येथे काही सहकाऱ्यांच्या मदतीने तिच्याच मोटारसायकलवर बसून तिला खडकी येथील मदरशात नेले. तिथे त्याने तरुणीवर अत्याचार करून तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले.तसेच तिला इंदूर येथे बोलावून धर्मांतर करून घेतले आणि नमाज पठण करायला लावले. यानंतर त्याने तिच्यावर निकाहासाठी जबरदस्ती केली.
अखेर तरुणी पोलिसात
आणखी वाईट गोष्ट म्हणजे हा विकृत तरुण काढलेल्या व्हिडिओ आणि फोटोंवरून सायम तिला ब्लँकमेल करत होता. जाकीर नाईकचे अनेक व्हिडिओ त्याने तिला पाठवले आणि तिच्यावर निकाह करण्यासाठी जबरदस्ती केली. त्याने तरुणीवर दबाव टाकत तिला इंदोरला बोलावून घेतले आणि एका मौलवीकडून तिला नमाज पठण करून धर्मांतर करून घेतले. तसेच निकाहसाठी तिच्यावर जबरदस्ती केली अशी तक्रार पीडित तरुणीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात इंदूरच्या मौलवीसह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी मुख्य आरोपी सायम याच्यासह त्याचे कोपरगाव येथील दोन साथीदार अशा तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच मौलवी आणि आणखी एक जण अशा दोन आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे केवळ कोपरगाव नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.