मुंबई ( इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या घरातून ईडीने काही कागदपत्रे आणि साडे अकरा लाख रुपयांची रोकड जप्त केली. या जप्त केलेल्या रोख रक्कमेपैकी दहा लाख रुपयांची रक्कम ही एकनाथ शिंदे यांच्या नावावर असल्याचे आढळून आल्यामुळे त्याबाबत चर्चा रंगली आहे. या रक्कमेवर एकनाथ शिंदे अयोध्या असे लिहले होते. त्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केसरकर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अयोध्येत काही करायचे असेल म्हणून ते पैसे काढले असावेत. ईडीला या पैशांचा स्त्रोत दाखवावा लागणार असून राऊत हा स्रोत दाखवतील.
यावेळी केसकर यांनी ईडीच्या एकुण कारवाई बाबत ही आपले मत दिले. ते म्हणाले की राज्यात ईडीने केलेल्या ९० टक्के कारवाया या बिल्डरांविरोधात असून १० टक्के कारवाया राजकीय नेत्यांविरोधात केल्या आहे. राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत यांना चार महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यांनी सातत्याने चौकशीसाठी वेळ मागून घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
ईडीने रविवारी संजय राऊत यांच्या घरावर धाड टाकली. त्यानंतर त्यांना अगोदर ताब्यात घेण्यात आले व रात्री उशीरा अटक करण्यात आली. आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यात काय निर्णय होतो हे महत्त्वाचे असणार आहे.