दिंडोरी – दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडी येथील जंगलात सहा वर्षाच्या अनोळखी बालिकेला फासावर लटकावून मारण्याच्या प्रयत्न केल्याची खळळजनक घटना घडली आहे. सदर बालिकेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
सविस्तर वृत्त असे की शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास देहरेवाडी येथील गुराखी नारायण गांगुर्डे हे आपले नेहमीप्रमाणे जनावरे चारीत असताना जंगलात काही तरी आवाज व झटापट होत असल्याची जाणीव झाली. त्याने जंगली जनावरे असावे, असा अंदाज करुन त्या दिशेने पाहणी केली असता एक इसम मुलीला फासावर लटकवत असल्याचे दिसून आले. गांगुर्डे यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता दाट झाडे झुडपांचा फायदा घेत तो फरार झाला. सदर घटना त्यांनी रवळगाव पोलीस पाटील साहेबराव साळवे यांना सांगितली त्यांनी दिंडोरी पोलिसांना कळविले, व मुलीला तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मुलीची ओळख पटलेली नाही. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी पाहणी करून अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे, मुलीच्या अंगात पिवळ्या गर्द रंगाचा फ्रॉक, पायात काळे बूट व नाकात तांब्याच्या धातूची मूरणी घातली आहे रात्री उशिरापर्यंत मुलीची ओळख पटू शकली नाही, पुढील तपास दिंडोरी पोलीस करत आहे.