दिंडोरी– न्यायालयीन प्रक्रियेमुळे अधिसूचना रखडलेल्या दिंडोरी नगरपंचायत निवडणूकीची अधिसूचना जाहीर झाली असून २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या जाहीर झाल्या. दुपारी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. २ डिसेंबर पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार असून ७ डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्यात येतील. ८ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होईल. १३ डिसेंबर पर्यंत अर्ज माघारी घेता येईल. उमेदवारांना चिन्हाचे वाटप व अंतिम उमेदवार यादी प्रसिद्धी अर्ज माघारीच्या दुसऱ्या दिवशी करण्यात करण्यात येईल. २१ रोजी मतदान होईल. २२ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निलेश श्रीगी ( उपजिल्हाधिकारी भूसंपादन) सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी नागेश येवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. नगरपंचायतवर सत्ता मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी डावपेच आखण्यास सुरवात केली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी अत्यंत कमी वेळ मिळणार असल्याने इच्छुक उमेदवारांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी तसेच राजकीय गणिते जुळवण्यासाठी राजकीय नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे.