नाशिक : दोघा मित्रांना मारहाण करून मोबाईल पळवून नेणा-या तिघाजणांना अटक करण्यात मुंबईनाका पोलीसांना यश आले आहे. या त्रिमूर्ती मध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून ते हाती लागल्याने अन्य चार मोबाईल चोरीचेही गुन्हे उघडकीस आले आहेत. संशयीतांच्या ताब्यातून मोबाईल सह दुचाकी असा सुमारे १ लाख ३५ हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
कार्तिंक अभय सिंघवी (१९ रा.विभाशांता अपा.मॉडेल कॉलनी जेलरोड) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव असून त्याचे दोन अल्पवयीन साथीदारांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. रवि शंकर मार्ग भागात राहणाºया उत्कर्ष प्रशांत घुगे (१७ रा. कुर्डूकर नगर) या मुलाने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. घुगे गुरूवारी (दि.२५) रविशंकर मार्गावरील अँबीशन शाळेजवळून मित्र कुशल चौधरी याच्या समवेत मोबाईलवर गाणे ऐकत रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. अॅबीशन शाळेजवळ दुचाकी लावून गप्पा मारत असलेल्या त्रिकुटाने मोबाईलवरील गाणे बंद करण्यास सांगितले. यावेळी घुगे याने काय झाले अशी विचारणा केली असता तिन जणांच्या टोळक्याने दोघा मित्रांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत त्यांच्या हातातील सुमारे ३० हजार रूपये किमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला होता.
याप्रकरणी तक्रार दाखल होताच मुंबईनाका पोलीस कामाला लागले होते. वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा कामाला लागली असतांना खबºयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलीस परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून त्रिकुटाचा शोध घेत असतांनाच संशयीत जेलरोड भागातील असून ते शनिवारी (दि.२७) अशोकामार्गावर दुचाकीवर ट्रिपलसिट फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी हुडकून काढत त्रिकुटाच्या मुसक्या आवळल्या असून त्यातील दोघे अल्पवयीन आहेत. या त्रिकुटाने लुटमारीसह अन्य चार गुह्यांची कबुली दिल्याने त्यांच्या ताब्यातून लुटमारीतील एक व चोरीचे चार मोबाईल आणि अॅव्हेन्चर दुचाकी असा सुमारे १ लाख ३५ हजार रूपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.