दिंडोरी : राज्यातील साखर उद्योग अत्यंत प्रतिकूल परिस्थितून वाटचाल करत असताना काही वर्षांपूर्वी मोठ्या अडचणीत सापडलेला कादवा कारखाना चेअरमन श्रीराम शेटे यांचे नेतृत्वाखाली योग्य नियोजनाने अत्यंत सुस्थितीत चालू असून सहकारपुढील हा एक चांगला आदर्श आहे असे प्रतिपादन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगत कौतुक केले.
राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कादवा सहकारी साखर कारखान्यास भेट देत इथेनॉल प्रकल्पाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी चेअरमन श्रीराम शेटे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड,विक्रीकर आयुक्त सुमेरसिंह काले, लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांचे स्वागत करत कारखान्याची वाटचाल विशद केली .
पुढे बोलताना साखर आयुक्त गायकवाड यांनी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे साखर उद्योग मोठ्या अडचणीत सापडलेला असताना इथेनॉल प्रकल्पांमुळे साखर उद्योग सावरला जाईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की, कादवाचे सभासद इथेनॉल प्रकल्पासाठी ठेवी देत आहे, ही आनंदाची बाब आहे. अधिक ठेवी ठेवल्याने त्यात कारखान्यास फायदा होणार आहे. तसा शेतकऱ्यांनाही अधिक व्याज मिळत होणार आहे. शासनाने अध्यादेश काढत शेअर्सची रक्कम पाच हजाराने वाढवली असून सदर रक्कम इतर कारखान्यांनी जमा करण्यास सुरुवात केली आहे. ती कादवा नेही सुरू करावी.साखर निर्मिती कमी करणे ही काळाची गरज असून त्यासाठी इथेनॉल सोबत च विविध बायो प्रोडक्ट निर्मिती होणे गरजेचे आहे. विविध औषधी कंपन्यांना आवश्यक घटक निर्मिती करणे शक्य असून असे प्रकल्प सुरू होणे गरजेचे आहे. कादवाकडे कोणतेही उपपदार्थ निर्मिती नसताना नफ्यात आहे इतर कारखाने केवळ साखर निर्मितीवर अवलंबून नसून ते इतर उप पदार्थ निर्मितीमुळे नफ्यात आहे कादवाचा इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित झाल्यास त्याचा अधिक फायदा ऊस उत्पादकांना होणार आहे. यावेळी साखर आयुक्त गायकवाड यांनी कारखान्याचे कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत विविध सूचना केल्या.
यावेळी सभासद द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक सुरेश मामा कळमकर ,विलास पाटील,तज्ञ संचालक संपत कोंड यांनी कारखान्याचे इथेनॉल प्रकल्पासाठी ठेविचा धनादेश आयुक्त गायकवाड यांचे हस्ते सुपूर्द केला. यावेळी व्हा चेअरमन उत्तम बाबा भालेराव, संचालक मधुकर गटकळ,त्रंबक संधान,शहाजी सोमवंशी,बाळासाहेब जाधव,दिनकरराव जाधव,बापूराव पडोळ,विश्वनाथ देशमुख,कामगार युनियन अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे,सुखदेव जाधव,सुभाष शिंदे,शिवाजी बस्ते, सुनील केदार,रामदास पाटील,नामदेव घडवजे,रघुनाथ जाधव,कार्यकारी संचालक हेमंत माने प्रशासकीय सल्लागार बाळासाहेब उगले,जे एल शिंदे,मुख्य अभियंता विजय खालकर,चीफ केमिस्ट सतीश भामरे, डीस्टीलरी प्रमुख सुदाम पवार,स्थापत्य अभियंता शरदचंद्र चव्हाणके,लेखापाल सत्यजित गटकळ,सचिव राहुल उगले,शेतकी विभागाचे लीलाधर घडवजे आदींसह सर्व अधिकारी कामगार उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार संचालक शहाजी सोमवंशी यांनी मानले. यावेळी साखर आयुक्त गायकवाड यांचे हस्ते इथेनॉल प्रकल्प आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
सभासदांनी ठेवी द्याव्या
कारखान्याकडे स्वतःचे भांडवल असणे गरजेचे असून कारखान्यांना कर्ज घेत कारखाने चालवताना मोठ्या प्रमाणात व्याज द्यावे लागते. जर शेतकऱ्यांनी कारखान्याकडे ठेवी ठेवल्या तर त्यात कारखान्यांनाही कमी व्याज लागेल व शेतकऱ्यांना ही बँकांपेक्षा जास्त व्याज मिळेल तरी शेतकऱ्यांनी ठेवी ठेवाव्या असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.
बायो सीएनजी चाही विचार व्हावा
आज पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढत असल्याने इथेनॉल ची गरज वाढणार असून थेट इथेनॉल वर चालणारे ट्रॅकटर व इतर वाहन बनविण्यात येत आहे तसेच या इथेनॉल प्रकल्पातच बायो सीएनजी प्रकल्प सुरू करणे शक्य आहे तरी कादवाने त्यादृष्टीने प्रयत्न करावे असे आवाहन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.