दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरी तालुक्यातील अक्राळे शिवारात मुंगसाची शिकार करणाऱ्या पाच संशयितांना वनविभागाने गजाआड केले आहे. या संशयितांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आहे. पंडित काशिनाथ दिवा, ऋतिक अर्जुन भोगे, तेजस कासू रिजड, संतोष अर्जुन भोगे अशी संशयितांची नावे आहेत.
हे सर्व संशयित गुजरातमधून मजुरीसाठी आले असून त्यांनी ही मुंगसाची शिकार केली आहे. तालुक्यातील उमराळे शिवारातील न्याहारी डोंगराच्या वनक्षेत्रात ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांची शिकार केली जात असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली.
वन्यजीव संरक्षण कायद्यातील नवीन सुधारणेनुसार मुंगुसाची शिकार करणे म्हणजे वाघाच्या शिकारीप्रमाणेच गंभीर मानली जाते. त्यामुळे वनविभागाने या शिकारीचे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई केली. या टोळीने दिंडोरी वनपरिक्षेत्रांतर्गत अक्राळे येथील न्याहारी डोंगरावरील वनात जाऊन दोन मुंगूसांना ठार मारल्याचे समोर आले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा जोशी, वनपाल अशोक काळे यांच्या पथकाने सापळा रचून पाचही संशयितांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.