दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील चिंचखेड येथे दहा ते बारा एकर ऊसाला आग लागल्याची घटना घडली. ऊसाच्या शेतावरून महावितरणाची मेन विद्युत लाईन गेलेली असून या विद्युत लाईनच्या स्पार्किंगमुळे आगीची घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. तीन ते चार शेतकऱ्यांचा तब्बल दहा ते बारा एकर ऊस जळून खाक झाला आहे. घटनास्थळी पिंपळगाव येथील अग्निशामक दल पोहोचले असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले आहे. महावितरणाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाला असल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शासनाने त्वरित पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.