दिंडोरी – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचेबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या नावाने अकाउंट खोलून नथुराम गोडसे बना असे आवाहन करणाऱ्या बागलाण तालुक्यातील दिंडोरी तालुक्यात वरवंडी येथील फार्मसी विद्यालयात शिकणाऱ्या युवकास दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेत त्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की वेळ आलीय बारामतीच्या गांधीजी साठी बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची अशी आक्षेपार्ह पोस्ट बागलाणकर या फेसबुक पेजवर निखिल भामरे (वय २२, रा. पिंगळवाडे, ता.सटाणा) येथील विद्यार्थ्याने केली होती. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तक्रार दाखल केली होती. सदर पेज बागलाणकर असल्याने सदर पोस्टकर्ता येथील असल्याचे संशयातून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना सदर संशयिताचा शोध घेण्यास सांगितले होते. पोलीस प्रशासनाने त्या खात्याचा शोध घेतला असता ते दिंडोरी तालुक्यातील वरवंडी येथून सदर पोस्ट झाल्याचे समजताच शोध घेण्यात आला. राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष शाम हिरे अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष तौसिफ मनियार यांनी त्याचा शोध घेतला असता तो महावीर फार्मसी कॉलेजचा विद्यार्थी असल्याचे निष्पन्न झाले. दिंडोरी पोलिसांनी त्यास ताब्यात घेत चौकशी सुरू केली. त्याचे पालकांना बोलवून त्यास समज.देण्यात आली. दिंडोरी पोलिसांनी भा.द.वी. 294/153(अ), 500, 501,504,506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. निखिल भामरे याच्याविरुद्ध नाशिक पोलीस ठाणे, कळवा पोलीस ठाणे, बारामती पोलीस ठाणे, येथे गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे हवालदार राजेंद्र लहारे आदी तपास करत आहेत.