अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोरोना महामारीच्या काळात पेमेंट्स उद्योगात मोठे बदल दिसून आले. सध्या, जास्तीतजास्त ग्राहकांना डिजिटल पेमेंटचा पर्यायच सोयीस्कर वाटताना दिसतो आहे. २०२२ हे वर्षदेखील डिजिटल पेमेंटच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण क्रिप्टोकरन्सीमध्येदेखील या संपूर्ण वर्षात वाढ दिसून येणार आहे.
एपीएमईए पेमेंट्सचे प्रमुख मुरलीधरन श्रीनिवासन यांच्या मते, या वेगाने बदलत असलेल्या उद्योगाच्या वरच्यास्थानी राहण्यासाठी किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. अशा काळात डिजिटल पेमेंट उद्योगात २०२२ मध्ये अनेक नवीन बदल अपेक्षित आहेत. बिटकॉइन ही मूळ आणि सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे. २००८मध्ये ही करन्सी रिलीज झाली होती. परंतु गेल्या काही वर्षांत बिटकॉइनने डिजिटल मालमत्तेच्या बाबतीत वेगाने वाढ नोंदवली आहे. बाय नाऊ, पे लेटर (बीएनपीएल) म्हणजेच आता खरेदी करा, नंतर पैसे द्या या पद्धतीने ऑनलाइन खरेदीला नाविन्यपूर्ण आणि सुलभ केले आहे. यामुळे साहजिकच खरेदी – विक्रीमध्ये वाढ झाली आहे. या प्रकारच्या सेवेत येत्या काही दिवसात आणखी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
२०२२मध्ये, बीएनपीएल व्यापाऱ्यांचा अनुभव विशेष बनवण्यासाठी काम करेल. याचा अर्थ वापरकर्ते कोणत्या दुकानातून किंवा ऑनलाइन खरेदी करायची हे ठरवू शकतील. बीएनपीएलमुळे ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. ज्यामुळे वापरकर्त्याला वेगवेगळ्या व्यापार्यांमधील किंमतीतील फरक पाहता येतो. यामुळे खरेदीदाराला खरेदी करताना विश्वासही वाटतो. येत्या काही दिवसांत, आम्ही पेमेंट पर्याय म्हणून स्टॉक आणि क्रिप्टो समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामुळे ग्राहकांना स्टॉक आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये अधिक गुंतवणूक करता येईल, असेही पेमेंट्सचे प्रमुख मुरलीधरन श्रीनिवासन यांनी सांगितले आहे. बदलत्या पेमेंट योजनांमुळे बाजारात पैसा खेळता राहील, त्यामुळे साहजिकच भविष्य लाभदायी असणार आहे. हे वर्ष ग्राहकांचा खरेदीचा अनुभव अधिकाधिक सोपा करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. एकूणच डिजिटल पेमेंट प्रकारामुळे बाजारात आर्थिक वृद्धी होणार असल्याचे चित्र आहे.