मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई म्हणजे अनेकांचे स्वप्न पूर्ण करणारे शहर आहे. यामुळेच हीला स्वप्ननगरी, मायानगरी असेही म्हणतात. लाखोंचे आयुष्य बदलणाऱ्या या शहरात काही वर्षांपूर्वी केवळ १०० रुपये सोबत घेऊन येणारे सुभाष रुनवाल यांची संघर्षगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अक्षरश: शुन्यातून विश्व निर्माण करत त्यांनी आज बांधकाम क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. कोट्यवधींचे मालक ते अभिनेता शाहरुख खान यांचे शेजारी असलेले रुनवाल आज खऱ्या अर्थाने रिअल लाइल आयडॉल आहेत.
धुळे या छोट्याशा शहरातून शंभ्रर रुपये सोबत घेऊन रुनवाल यांनी मुंबई गाठली. मेहनत, चिकाटी, आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी काही वर्षांतच बांधकाम क्षेत्रात नाव काढले. मात्र, हा प्रवास सोपा नव्हता. प्रचंड अडथळे, समस्यांचा सामना करत रुनवाल यांनी यशाचा बेंचमार्क सेट केला आहे. आज ८० वर्षीय सुभाष रुनवाल हे मुंबईतील आघाडीच्या डेव्हलपर्सपैकी एक आहेत. ते रुनवाल ग्रुपचे अध्यक्ष आहेत. त्यांची कंपनी अफोर्डेबलपासून लक्झरी अपार्टमेंट्स आणि शॉपिंग मॉल्सची उभारणी करते. त्यांनी १९७८ मध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली. त्यांची पहिली मालमत्ता ठाण्यात २२ एकरांची होती आणि त्याच शहरातील किर्तीकर अपार्टमेंट नावाची १०,००० चौरस फुटांची हाऊसिंग सोसायटी हा त्यांचा पहिला प्रकल्प होता. लोकांना कमी किमतीत घरे उपलब्ध करून दिल्याने ते प्रसिद्ध झाले. सुभाष रुणवाल यांची एकूण मालमत्ता ११,५०० कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे.
अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात
रुनवाल यांचे प्राथमिक शिक्षण धुळ्यात झाले. पुण्यात शिक्षण घेऊन बीकॉमची पदवी पूर्ण केल्यानंतर रुनवाल वयाच्या २१ व्या वर्षी अकाउंटंट होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईला आले. १९५४ मध्ये जेव्हा ते मुंबईत पोहोचले तेव्हा त्यांच्या खिशात फक्त १०० रुपये होते. आपल्या मेहनतीच्या जोरावर ते सीए झाले आणि एका कंपनीत काम करू लागले. १९६७ मध्ये त्यांना अमेरिकेत मोठ्या पगारावर कंपनीतून मोठी पोस्टिंग मिळाली. पण तिथल्या जीवनशैलीशी जुळवणे कठीण जात असल्याने ते पुन्हा भारतात आले. जेव्हा त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली तेव्हा रुनवाल मुंबईतील कुर्ला भागात भाड्याच्या वन रूम- किचनमध्ये राहत होते. त्यानंतर ते घाटकोपरमध्ये दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहण्यास गेले. मात्र, आज सुभाष रुणवाल बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे येथील मन्नत या बंगल्याशेजारी आलिशान घरात राहतात.
Dhule Mumbai Subhash Runwal Success Story billionaire