इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मुलन समिती यांच्यातील वाद पोलीस ठाण्यात पोहोचला आणि आता तो वर्ड वॉरवर येऊन पोहोचला आहे. बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांचे आव्हान स्वीकारत त्यांना रायपुरात येण्याचे आवाहन केले आहे.
या संपूर्ण वादाचं मूळ नागपूर येथे आहे. नागपूर येथे धीरेंद्र शास्त्री यांचा भागवत सप्ताह सुरू होता. त्यावेळी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या स्थानिक शाखेने धीरेंद्र शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप केला. त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली. समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री यांना खुले आव्हान दिले. ‘चमत्कार दाखवा, ३० लाख रुपये देतो’, आव्हान श्याम मानव यांनी दिल्यावर धीरेंद्र शास्त्री यांनी सात दिवसांचा कार्यक्रम पाचच दिवसांत संपवला व निघून गेले. त्यामुळे त्यांच्यावर पळकुटेपणाचाही आरोप करण्यात आला. माध्यमांमध्येही धीरेंद्र शास्त्री यांच्या भूमिकेवर टीका करण्यात आली. पण प्रकरण एवढ्यावर संपले नाही. नागपूरच्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीने पोलिसांत तक्रार देताना कारवाई झाली नाही तर न्यायालयात जाऊ, असा इशारा दिला.
दिव्य दरबारात का आले नाही?
श्याम मानव यांनी रायपूरला यावे, तिकीटांचे पैसे मी देईन. तुमचे आव्हान मी स्वीकारले आहे. पण दिव्य दरबार लावला होता, तेव्हा का आले नाही? ते आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केली.
संकुचित मनाचे लोक
आमच्यावर टीका करणारे लोक संकुचित मनाचे आहेत. कारण आम्ही कधीच आपली समस्या सोडविणाचा दावा लोकांपुढे करत नाही. आम्ही अंधश्रद्धेच्या बाजूनेही नाही. आमचे इष्टच लोकांची समस्या दूर करतात. आता आम्ही हनुमानाचा प्रचार केला किंवा पुजा केली, तर चुकीचे केले का, असा सवालही त्यांनी केला आहे.
कुत्ते भौंके हजार
धीरेंद्र शास्त्री चमत्काराचे दावे करून कायद्याचे उल्लंघन करीत आहेत, असा आरोप अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केला होता. त्याला उत्तर देताना शास्त्री यांनी ‘हाथी चले बजार, कुत्ते भौंके हजार’ अशी प्रतिक्रिया देत हे लोक धर्माच्या विरोधात असल्याचे मतही व्यक्त केले आहे.
Dhirendra Krushna Shastri Accept Challenge of Shyam Manav