मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि शिवसेना हे नाव व पक्ष गेल्यानंतर प्रथमच राज्याच्या राजकारणात आज एक महत्त्वाची घटना घडली आहे. ती म्हणजे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विधान भवनामध्ये एकत्र एण्ट्री झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही नेते गेटपासून विधान भवनापर्यंत एकत्र गेले. यावेळी त्यांनी उपस्थितांना नमस्कारही केला. तसेच, हसतमुखाने त्यांनी केलेली एण्ट्री सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
अधिवेशन संपता संपता दिसलेले चित्र
उपमुख्यमंत्री फडणवीस येत असताना उद्धव ठाकरे थांबले..दोघे एकत्र चालत विधी मंडळाच्या पायऱ्या चढले..
दोन जुने मित्र ' शिवसेना ' हातातून गेल्यावर एकत्र दिसले! #मैत्री #शत्रू #राजकारण pic.twitter.com/N1CR2RBSGn— Rashmi Puranik (@Marathi_Rash) March 23, 2023
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. आणि हे अधिवेशन संपता संपता आज एक वेगळे चित्र सर्वांना पहायला मिळाले. एकेकाळी एकत्र नांदणारे शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष आता एकमेकाचे शत्रू झाले आहेत. खासकरुन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात तब्बल ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंड केले आहे. शिंदेंच्या नेतृत्वातील सेना आणि भाजप यांनी राज्यात सत्ता स्थापन केली आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडीची सत्ता उलथून टाकण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील हे सरकार कोसळले. ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात अभूतपूर्व सत्तासंघर्ष पहायला मिळाला आहे.
२०१९मध्ये लोकसभा निवडणुकीत ठाकरे आणि फडणवीस हे प्रचारासाठी एकत्र दिसले होते. त्यानंतर आता थेट ४ वर्षांनी हे दोन्ही नेते एकत्र दिसले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला फडणवीसांनी वेळोवेळी खिंडीत गाठले होते. सरकारच्या चुका आणि कारभारावर त्यांनी ताशेरे ओढले होते.
खासकरुन ठाकरे आणि फडणवीस हे एकमेकांवर गंभीर आरोप करीत आहेत. राजकीय टीका आणि आरोप-प्रत्यारोपांनी राज्याचे राजकारण ढवळून निघत आहे. असे असतानाच एकमेकांचे पक्के शत्रू बनलेले ठाकरे आणि फडणवीस हे आज विधिमंडळाच्या गेटवर एकत्र आले. सर्वप्रथम गेटवर उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. त्याचवेळी त्यांना समजले की, फडणवीसही तेथे येत आहेत. त्यामुळे काही सेकंद ठाकरे हे थांबले. त्यानंतर फडणवीस आणि ठाकरे यांनी स्मितहास्य करीत एकमेकाला नमस्कार केला. त्यानंतर हे दोन्ही नेते स्मितहास्य करीत विधिमंडळाच्या पायऱ्यांपर्यंत गेले. दोघांनीही विधिमंडळात एकत्र प्रवेश केल्याने ही बाब सध्या चर्चेची बनली आहे.
Devendra Fadnavis Uddhav Thackeray Joint Entry in Assembly Session