देवळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरातील कोणालाही न सांगता निघून गेलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचा देवळा पोलिसांनी तक्रार दाखल होताच चोवीस तासांच्या आत शोध घेत त्याला सुखरूप त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले. देवळा पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून मुलाच्या आई-वडिलांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
देवळा तालुक्यातील वासोळपाडे (फुलेनगर) येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा सोमवारी (दि.५) सकाळी साडे अकराच्या दरम्यान घरातील कोणालाही न सांगता घरातून निघून गेला होता. आई-वडील व नातेवाईकांनी परिसरात चार-पाच दिवस शोध घेतला मात्र, मूलगा सापडला नसल्याने रविवार (दि.११) दुपारी मुलाच्या आई वडीलांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ व त्यांच्या पथकाने मुलाची माहीती व दिलेल्या वर्णनावरून मुलाच्या शोधासाठी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. विविध ठिकाणी विचारपूस करत मुलाचा शोध सुरू झाला. रात्री ९:५० वा. सदर मुलाने त्याच्याजवळील मोबाईल चालू केला. लागलीच शिरसाठ यांनी त्याचे लोकेशन घेऊन त्यांचे मित्र पोलीस समाधान शिंदे यांना माहिती दिली. समाधान शिंदे कामावरून घरी येऊन जेवणाला बसले होते. मात्र मुलगा अल्पवयीन असल्याने त्यांनी जेवणाचे ताट बाजूला करून भर पावसात मुलाचा शोध सुरू केला. अन् अखेर तो पाऊस सुरू असल्याने नाशिक शहरातील गंगापूर रोड या परिसरातील एका दुकानाच्या बाहेर कोपऱ्यात बसलेला आढळून आला.
त्याच्याकडे विचारपूस केली असता. बेपत्ता मुलगा हाच असल्याची खात्री पटविण्यासाठी पोलीस समाधान शिंदे यांनी त्याचे छायाचित्र घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना पाठवले. मुलाच्या आई-वडीलांनी दिलेल्या वर्णनाचा मुलगा हाच असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन देवळा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी त्याचे योग्य समुपदेशन करून आई वडीलांच्या ताब्यात दिले. यावेळी मुलगा सुखरूप परतल्याने मुलाच्या आई-वडिलांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.