देवळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शालेय विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवता यावे यासाठी नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील दहिवड या गावात ग्रामस्थांनी एकत्रित येत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोबत मोबाईल आणू नये आणि आणला तरी तो शालेय वेळेत मोबाईलचा वापर करू नये असा निर्णय नाशिकच्या देवळा तालुक्यातील दहिवडच्या ग्रामस्थांनी घेतला आहे. ग्रामस्थांच्या सह्या असणारे निवेदन गावातील सर्व शैक्षणिक संस्थांना देण्यात आले आहे. शैक्षणिक संस्थांनीही त्यास अनुकुलता दर्शविली आहे. तसेच, पालकांनीही आता निश्चय केला आहे की, पाल्यांना मोबाईल द्यायचा नाही. त्यामुळे याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.