महेश शिरोरे
देवळा : देवळा नगरपंचायतीची दुसरी पंचवार्षिक निवडणूक जाहीर होताच निवडणुकीसाठी भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, शिवसेना या राजकिय पक्षांची व्यूहरचना सुरु झाली असून मातब्बर उमेदवारांची शोधमोहीम सुरू झाली आहे. राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी,विद्यमान नगरसेवक, नगरसेविका, स्थानिक नेते, इच्छुक उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपञाची जमवाजमव करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.भाजप स्वबळावर नगरपंचायत निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना,महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपचा मिञ पक्ष असलेल्या शिवसंग्राम ,आरपीआय या पक्षांच्या नेत्यांनी अद्याप आपली भुमिका स्पष्ट केलेली दिसत नाही. गेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस आय पक्षांच्या तिकिटावर निवडणूक लढवणा-या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षांच्या नेत्यांची मोठी पंचायत झाली आहे. त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली दिसत नसली तरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपले उमेदवार उभे करण्याच्या तयारीत दिसत आहेत.
देवळा नगरपंचायतीत प्रहार शेतकरी संघटना सुद्धा आपला नगरसेवक असावा म्हणून एक दोन प्रभागात उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या राष्ट्रीय पक्षांची उमेदवारी मिळवण्यासाठी पॅनलच्या नेत्यांच्या भेटीवर भर दिला आहे. तर दुसरीकडे राजकिय पक्षांचे नेते मातब्बर उमेदवार गळाला लावण्यासाठी स्थानिक पातळीवर मोर्चबांधणी करत असल्यामुळे इच्छुक उमेदवारांची चागंलीच ताराबंळ उडाली आहे. गेल्या वर्षापासून निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या इच्छुक उमेदवारांची नवीन आरक्षण रचनेमुळे मोठी पंचायत झाली आहे. तरी नवीन प्रभाग शोधण्याची तयारी केली आहे. काही उमेदवारांनी तर पक्षांची उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी सुरु केली आहे. तर काही इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुद्धा सुरुवात करत मतदारांच्या भेटीवर भर दिला असल्याने आतांपासून गमतीदार किस्से ऐकू येऊ लागले आहेत. गल्लीबोळात,चौकांचौकात, कट्यांकट्यावर रोज नवीन नवीन उमेदवारांच्या नावांची चर्चा होत असल्यांमुळे निवडणुकीची चाहुल मतदारांना होऊ लागली आहे. आणि कोण कोण उमेदवार निवडणुकीला सामोरे जाईल हीच चर्चा रंगू लागली आहे. , काही इच्छुक उमेदवार आपल्या बरोबर पत्नी, मातोश्री, किवा भाऊ, यांना नगरपंचायतीच्या निवडणुकीला उभे करण्याच्या तयारीत दिसत आहेत. नगरपंचायतीच्या भावी नगरसेवक पदाची स्वप्न पडू लागलेल्या इच्छुंक उमेदवारांची नगरपंचायत व महसुल थकबाकी भरण्यासाठी धावपळ करतांना दिसत आहेत. इच्छुक उमेदवार आणि समर्थक कार्यकर्ता यांनी सोशल मीडिया आणि व्हॅाटसअॅप संदेश यावर मोठा जोर दिला आहे. काही प्रभागामंध्ये आतांपासून मतदारांना खूष ठेवण्यांचा एककलमी कार्यक्रम राबवला जात असल्याने ,हॅाटेल धाब्यावंर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसू लागली आहे. एकाच पक्षांकडून अथवा पॅनलकडून उमेदवारी मिळवण्यासाठी तयारी केल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांना उमेदवारी देतांना दमछाक होणार आहे. अंतिम टप्यांपर्यत देवळा नगरपंचायत काही प्रभागांमध्ये निवडणूक चुरशीच्या होण्याचे संकेत मिळत आहेत,निवडणूक ही थंडीच्या दिवसात होत असली तरी देवळा शहराचे वातावरण माञ गरम होत चालले आहे,