सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वारकरी दिंडी, लेझीम पथक, ब्रॉस बँड तसेच हजारो भक्तांच्या साक्षीने देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या १३५ व्या पुण्यतिथी निमित्ताने सटाणा येथे भव्य रथोत्सव संपन्न झाला. परंपरेनुसार देव मामलेदार यांचा रथ पोलिसांच्या हस्ते ओढून रथयात्रेला सुरुवात करण्यात आली. वारकरी दिंडी, देव मामलेदार यांच्या हस्ते धान्य वाटप, प्रभू श्रीराम देखावा, श्री दत्त संप्रदाय आदी जिवंत देखावे सादर करत सटाणा शहरातील शाळा, महाविद्यालये या रथ यात्रेत सहभागी झाले. सटाणा शहरातील मध्यवर्ती भागातून ही रथ मिरवणूक काढण्यात आली. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सुनील मोरे मित्र मंडळाच्या वतीने देव मामलेदार यशवंतराव महाराज मंदिरावर व रथ मिरवणुकीत हेलिकॉप्टर द्वारे जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात आली. हजारो भाविकांच्या साक्षीने या भव्य दिव्य अशा यात्रोत्सवास रथ यात्रेने सुरुवात झाली.