इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– बुलेटवरील भारत भ्रमंतीचा थरार – भाग २
बुलेटवरील भारत भ्रमंतीविषयी आपण जाणून घेत आहोत. आमच्या राईडला सुरुवात झाली ती राजधानी नवी दिल्लीत. भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली येथून फ्लॅग ऑफ केल्यानंतर सर्वप्रथम आम्ही इंडिया गेट आणि शहीद जवानांना श्रद्धांजली देता यावी म्हणून वॉर मेमोरियल येथे गेलो. देशासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक शहीद जवानाला आम्ही सर्व फ्रीड मोटोरायडरने श्रद्धांजली वाहिली. आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.
संपूर्ण दिवस राईड केल्यानंतर आम्ही चंदिगड येथे पोहोचलो. फ्रीडम मोटोराइडचा पहिलाच दिवस असल्यामुळे ते सगळं फार आकर्षित वाटत होतं. प्रवासाच्या दरम्यान आमच्या ताफ्याचे ठिकठिकाणी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत केले जात होते. त्यादरम्यान फुलांच्या माळा घालून आणि भारत माता की जय असे नारे देत आमचे प्रचंड जल्लोषात ठिकठिकाणी स्वागत केले गेले. चंदिगड येथे ज्या हॉटेलमध्ये आमचा मुक्काम होता त्या हॉटेलमध्ये आमचे स्वागत केले गेले. त्यानंतर चेकिंग करून रात्रीचे जेवण केले आणि सर्वजण आम्ही एकत्र जमून दुसऱ्या दिवशीच्या राईडचे प्लॅनिंग केले. कारण दिल्ली टू चंदिगड पोहोचताना ७५ बायकर्सच्या मोठ्या ताफ्याला ट्रॅफिकला सामोरे जाताना प्रचंड अडचणी येत होत्या. यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही एक मीटिंग घेतली. त्यात ट्रॅफिकचे नियोजन केले. बायकर्सचा ताफा पुढे अमृतसर पर्यंत कसा नेता येईल याचे नियोजन केले. सर्वजण आपापल्या हॉटेलच्या खोलीमध्ये जाऊन झोपलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता उठून आंघोळ आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर पुन्हा सर्वांनी आपापल्या बॅग गाडीला बांधण्यास सुरुवात केली. प्रचंड उत्साह आणि जोशाने आम्ही अमृतसरला जाण्यासाठी लाईन अप केले. आमच्यासोबत पोलिसांच्या दोन गाड्या सरकारतर्फे देण्यात आल्या होत्या. त्यामुळे ट्रॅफिक कंट्रोल करता येण्यास आम्हाला हातभार लागणार होता, तरीही आमच्यातल्या काही अनुभवी रायडरने मार्शलिंग करण्याचे ठरवले. आता यामुळे रस्त्यातील ट्रॅफिकला बाजूला सारण्याचे काम पाच मार्शल आणि दोन पोलिसांच्या गाड्या यांच्यावर जबाबदारी टाकली गेली. आता मात्र आमच्या बायकर्सच्या ताफ्याची विनाअडचण यात्रा सुरू झाली.
चंदीगड मधून निघाल्यानंतर जालंदर हा आमचा पहिला स्टॉप होता. तिथे आमच्यासाठी दुपारच्या जेवणाचीची सोय करण्यात आली होती. आणि पंजाबी जेवण आणि सोबत लस्सी ग्रेट कॉम्बिनेशनच पोटभर जेवण केल्यानंतर अमृतसरकडे आमचा ताफा निघाला. परंतु लस्सीवर येथेच ताव मारल्यामुळे आम्हा सर्वांना वाटेत झोप सुद्धा येऊ लागली. मग आम्ही थोडे पुढे जाऊन चार वाजता टी ब्रेक घेतला. थोडा वेळ रिलॅक्स केल्यानंतर आमचा ताफा पुन्हा निघाला. संध्याकाळी साडेसहा वाजता आम्ही अमृतसर येथे पोहोचलो. पुन्हा बाईक वरून आमच्या बॅगांची पॅकिंग करून हॉटेलमध्ये चेकिंग करून फ्रेश झालो. त्यादिवशी आम्ही सुवर्ण मंदिर येथे दर्शनासाठी गेलो. प्रचंड सुंदर आणि भव्य दिव्य सुवर्ण मंदिर होते. सुवर्ण मंदिरात श्री गुरुग्रंथ साहेब यांचे दर्शन घेऊन आम्ही लंगर मध्ये जेवलो. पुन्हा हॉटेलला येऊन आपापल्या खोलीत झोपी गेलो. अमृतसरच्या रात्री मला झोप येत नव्हती कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्हाला जम्मू गाठायचे होते. आणि माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच जम्मू काश्मीर पाहणार होते.
Column Bullet Ride India Tour Part 2 by Deepika Dusane